एका नवरीची चार नवरदेव वाट पाहातात तेव्हा…

मध्य प्रदेश : वृत्तसंस्था – भोपाळ येथील कोलारमधील एक धक्कादायक घटना प्रकार पुढं आला आहे. तेथील एक नवरदेव लग्नासाठी आला परंतू त्याला नवरी सापडली नसल्याने, तो पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेला. तर तिथे जाताच त्याला चक्क त्याच्यासारखेच आणखी ३ नवरदेव गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले दिसले. अशी एक आश्चर्यकारक घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिसांच्या चौकशीनुसार हरदाला राहणारा एक युवक गुरुवारी लग्नासाठी भोपाळ येथील कोलारमध्ये गेला होता. जन कल्याण समितीच्या कार्यालयात त्याचे लग्न होणार होते. पण कार्यालय बंद होते. दरवाजाला टाळे लागल्याचे बघून त्या नवरदेवाने आणि त्याच्या परिवाराने मुलीची चौकशी केली. तेव्हा त्यांना या नावाचे कोणी राहत नसल्याचे सांगितले गेल्याने त्यांना धक्काच बसला. यानंतर त्यांनी मुलीच्या नातेवाईकाच्या फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, फोन बंद होता. यामुळे काहीतरी गोंधळ असल्याचा संशय नातेवाईकांना आला.

तसेच या प्रकरणावरून फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी कोलारच्या पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, तेथे आधीपासूनच आणखी ३ नवरदेव लग्नाच्या पूर्ण तयारीत आल्याचे दिसले. परंतु या सर्वांचे चेहरे उतरलेले दिसले. कारण याच नवरीबरोबर हे ३ नवरदेव लग्न करण्यासाठी आले होते. यानंतर चारही नवरदेवांना लग्नाच्या नावाखाली फसविल्याचे उघड झाले. यादरम्यान, या चार नवरदेवाच्या आरोपांवरून चौकशी सुरु केली असता या टोळीमध्ये ३ जण असल्याचे समोर आले आहे. फोन नंबरच्या आधारे त्यांचा पत्ता शोधला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये १ महिला आणि २ पुरुष आहेत. असे सीएसपी भूपेंद्र सिंह यांनी सांगितले.

दरम्यान, हे अटक केलेले लोक ज्या जिल्ह्यांमध्ये लग्नासाठी मुलींची संख्या कमी आहे, किंवा लग्न करण्यात अडचणी आहेत अशा ठिकाणी जाऊन तेथील लोकांना फोन नंबर देऊन मुलगी बघतो म्हणून खोटं सांगायचे. लग्न जुळत नसल्याने लोकही त्यांना फोन करून भोपाळ येथे बोलवाचे. तर लेबर चौकात कामाच्या शोधात असणाऱ्या मुलींना हे टोळके २०० ते ५०० रुपयांमध्ये घेऊन यायचे. मुलाकडच्यांना त्या मुली दाखविल्या जायच्या. जेव्हा त्यांना मुलगी पसंत पडायची तेव्हा ते मुलाकडच्यांकडून २ हजार रुपये घ्यायचे आणि लग्न ठरल्याचे सांगायचे. या टोळीतील तिघांची चौकशी सुरू असून यापूर्वी काय प्रकार केला आहे याचा तपास पोलीस करत आहेत.