पाकचे चार खतरनाक दहशतवादी काश्मीरमध्ये सक्रिय

श्रीनगर : वृत्तसंस्था – हत्यार चालवण्याचे आणि हल्ला करण्याचे उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यात आलेले पाकचे चार खतरनाक दहशतवादी एम-४ कार्बाइन्स रायफल्ससह काश्मीरमध्ये दाखल झाले आहेत. सप्टेंबर महिन्याच्या साधारण १५ ते १६ तारखेपासून हे दहशतवादी काश्मीरमध्ये सक्रिय झाले आहेत. रविवारी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून सीआयडी अधिकाऱ्याची हत्या झाली. तसेच १८ सप्टेंबरला एका जवानावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात हा जवान जखमी झाला होता. यावरून गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीला पुष्टी मिळाली आहे.
गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दोन गटांमधले हे चार प्रशिक्षित खतरनाक दहशतवादी आहेत. स्थानिक समर्थकांच्या मदतीने त्यांनी काश्मीर खोऱ्यात तळ ठोकला आहे. त्यांच्याकडे एम-४ कार्बाइन्स रायफल्स असून त्यांना शोधून त्यांचा खात्मा करणे हे लष्करापुढचे नवे आव्हान आहे. आयएसआयने या चौघांनाही प्रशिक्षण दिले आहे. एम कार्बाइन रायफलवर टेलिस्कोप असल्याने तिच्यातून ५०० ते ६०० मीटरपर्यंतचा हल्ला करता येतो. डोंगरातून हल्ले करणे सोपे जाते आहे.
पंजाबच्या सीमेवर दोन पाकिस्तानी घुसखोरांना अटक
सीमा सुरक्षा दलांनी पंजाबच्या फिरोजपूर सीमेवरून दोन पाकिस्तानी घुसखोरांना अटक केली आहे. या दोघांकडे पाकिस्तानी सेनेची ओळखपत्रं आहे. तसेच त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी चलन, दोन मोबाइल, दोन सिम कार्ड जप्त करण्यात आले आहे. हे दोघेही भारतात घुसखोरी करण्याच्या बेतात होते त्याचवेळी सीमा सुरक्षा दलांनी ही कारवाई केली. या दोघांचीही कसून चौकशी सुरु आहे. हे दोघे नेमक्या कोणत्या कारणांसाठी भारतात येण्याचा प्रयत्न करत होते? याची चौकशी केली जाते आहे.