‘मुख्यमंत्री’ पद अन् ‘ही’4 खाती भाजपा आणि शिवसेनेच्या तणावाला जबाबदार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून अकरा दिवस उलटले तरी राज्यात अजूनही सरकार स्थापन झालेले नाही. मुख्यमंत्री पदाच्या तिढ्यामुळे सरकार स्थापन झालं नाही अशी चर्चा सुरु आहे. मात्र असे जरी असले तरी शिवसेना-भाजपा यांच्यातील कोंडीमागे केवळ मुख्यमंत्रीपद नसून अजूनही इतरही खाती आहेत. गृह, महसूल, नगर विकास आणि वित्त या महत्त्वाच्या चार खात्यांपैकी दोन खाती शिवसेनेला हवी आहेत. त्यामुळंच दोन्ही पक्षातील चर्चा पुढे जात नसल्याची माहिती समोर येत आहे.

मुख्यमंत्रिपदासह गृह, महसूल, नगर विकास आणि वित्त या चार महत्वाच्या खात्यांपैकी दोन खाती शिवसेनेला हवी आहेत. त्यामुळे ही चर्चा थांबली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सध्या गृह आणि नगरविकास ही दोन्ही खाती मुख्यमंत्र्यांकडे असल्यानं महसूल आणि वित्त ही खाती शिवसेनेला देऊन त्यांची नाराजी दूर करता येईल का याबाबत भाजपमध्ये चर्चा सुरु आहे.

राज्यात कोणता पक्ष सत्ता स्थापन करणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. विधानसभेचा निकाल लागून 11 दिवस उलटले आहेत. शिवसेना-भाजपला पूर्ण बहुमत मिळालं आहे. भाजप 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर शिवसेनेने 56 जागा जिंकल्या आहे. मात्र मुख्यमंत्री पदावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेदरम्यान चर्चा न होता दोन्ही पक्षांमधील संबंध अधिक ताणले गेले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी विधानसभेसाठी जो फॉर्म्युला ठरला होता, त्यानुसार अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची मागणी शिवसेना करत आहे. मात्र शिवसेनेची ही मागणी भाजपला मान्य नाही.

Visit : Policenama.com