Pune : युवा सेनेच्या पदाधिकार्‍याच्या मारेकर्‍यांना पोलिसांनी पकडलं, चौघे ताब्यात..

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात राजकीय वादातून शिवसेना पक्षाच्या युवासेनेचे पदाधिकारी व दिवंगत माजी नगरसेविकाचे सुपुत्र दीपक विजय मारटकर (वय ३२) यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात फरासखाना पोलिसांना यश आले आहे. काल पोलिसांनी सूत्रधार असणाऱ्या तिघांना पकडले होते. पण मारेकरी पसार झाले होते. त्यांनी मध्यरात्री विजयानंद चित्रपटगृह परिसरात तीक्ष्ण हत्याराने खून केला होता. यामुळे शहरातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती.

पोलिसांनी चौघांना आज सायंकाळी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सनी कोलते, संदीप कोलते, रोहित कांबळे, राहुल रागीर व इतर दोघांवर फरासखाना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वी अश्विनी कांबळे, महेंद्र सराफ आणि निरंजन म्हकाळे यांना अटक केली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी मारटकर यांचे मेहुणे राहुल भगवान आलमखाने (वय ४३,रा. गवळी आळी, विजयानंद चित्रपटगृहाजवळ, बुधवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.

दीपक यांचे वडील दिवंगत विजय मारटकर हे दोन वेळा नगरसेवक राहिले होते. दुर्दैवाने त्यांचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू झाला आहे. यानंतर आता दीपक हे राजकारणात चांगलेच सक्रिय झाले आहेत. अश्विनी कांबळे ही देखील राजकारणात असून, त्यांनी देखील निवडणूक लढवली होती. त्यावेळी मारटकर यांच्यात वाद झाले होते. राजकीय वैमन्यासातून कांबळे व सराफ यांच्या सांगण्यावरून संदीप कोलते, रोहित कांबळे, राहुल रागिर आणखी दोघांनी बुधवारी रात्री साडे बारा वाजता रस्त्यावरच तीक्ष्ण हत्याराने हल्लाकरत त्यांचा खून केला होता. यानंतर आरोपी पसार झाले होते.

दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांनी तपास करत मुख्यसूत्रधाराना पकडले. पण मारेकरी पसार झाले होते. त्यांचा शोध घेतला जात असताना आज त्या चौघांना पकडण्यात आले आहे.