पुण्यातील ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अजित पवारांचा मोठा निर्णय, आणखी ‘या’ चार IAS अधिकाऱ्यांची नेमणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. पुणे शहरासह आजूबाजूच्या उपनगरांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाने ग्रामीण भागात देखील शिरकाव केला असून ग्रामीण भागातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार आणखी चार आयएएस (IAS) अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी दिली.

अजित पवार यांच्या आदेशानंतर पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे ग्रामीण क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) आणखी चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी सांगितले.

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे सदस्य सचिव विश्वजीत माने यांच्याकडे पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे ग्रामीण व छावणी (कॅन्टोन्मेंट) हद्दीतील कोरोना तपासणी मान्यताप्राप्त लॅबवर नियंत्रण ठेवणे. या लॅबमध्ये कोरोना चाचणीची संख्या वाढवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे, तसेच या लॅबमध्ये पूर्ण क्षमतेने चाचण्या होतात का किंवा होत नाहीत याची तपासणी करणे. कोरोना चाचणीचा अहवाल समजण्यासाठी लागणारा कालावधी कमीत कमी करण्यासाठी आवश्यकत्या उपाययोजना करण्याची जबाबदारी माने यांच्याकडे देण्यात आली आहे.

क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे पॉझिटिव्ह रुग्ण निदर्शनास येतात, अशा व्यक्तींच्या संपर्कात येणाऱ्या सर्व व्यक्तींना शोधून काढण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त पवनीत कौर यांच्याकडे बाधित रुग्णांना बेडसाठी इतरत्र फिरावे लागू नये. रुग्णालयांमध्ये उपलब्ध बेड्सची माहिती उपलब्ध होण्यासाठी नियोजन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्याकडे सामाजिक संस्थांची मदत घेवून सुनियोजित पद्धतीने लोकसहभाग वाढवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.