छत्तीसगडमध्ये मुसळधार पावसात ‘थरार’ ! चकमकीत 4 नक्षलवाद्यांचा ‘खात्मा’

छत्तीसगड : वृत्तसंस्था – देशापुढे कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी डोके वर काढले आहे. छत्तीसगडमध्ये आज झालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांना ठार मारण्यात जवानांना यश आले आहे. पोलीस महानिरीक्षक पी सुंदरराज यांनी याबाबत माहिती दिली आहे.

जिल्हा राखीव दल, 201 बटालियन कोबरा आणि 223 बटालियन सीआरपीएफच्या जवानांनी सुकमामधील जगरगुडा जंगल परिसरात संयुक्तरित्या राबवलेल्या शोधमोहिमेंतर्गत ही कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील चिंतलनार भागात सुरक्षा दलाच्या जवानांनी शोधमोहिम सुरु केली तेव्हा ही घटना घडली. जवान जेव्हा जंगलातून बाहेर येतील तेव्हा संपूर्ण माहिती मिळेल, अशी माहिती पोलीस अधीक्षक शुलभ सिन्हा यांनी दिली.

चकमक झालेल्या ठिकाणाहून जवानांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा देखील हस्तगत केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. साधारण सकाळी साडे नऊच्या सुमारास जगरगुंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चकमकीस सुरुवात झाली जेव्हा नक्षलींच्या ठिकाणाचा शोध घेण्यासाठी जवान शोधमोहिमेवर निघाले होते. या परिसरात नक्षली दडून बसले असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. दरम्यान, जवानांच्या शोधमोहिमेचा सुगावा लागताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरु केला. प्रत्युत्तरात जवानांनी केलेल्या कारवाईत चार जणांचा खात्मा झाला.