खंडणी प्रकरणी माथाडी कामगार संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्षांसह चौघे अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – माथाडी कामगार संघटनेच्या नावावर कोथरूड येथील एका हॉटेल व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावणाऱ्या चार जणांना गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी हॉटेल व्यवसायिकास मागील एक ते दीड महिन्यापासून माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षारक्षक संघटनेच्या नावाखाली दरमहा १८ हजार रुपयाच्या हप्ता देण्याची मागणी केली होती. गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने वारजे माळवाडी भागात सापळा रचून चौघांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने आपण माथाडी कामगार संघटनेचा जिल्हाध्यक्ष असल्याचे पोलिसांना सांगितले.

ओम तिर्थराम धर्मजिज्ञासू (वय-३० रा. शास्त्री नगर, कोथरूड), ललीत मारूती काकडे (वय-२८ राय गणपती मंदिरासमोर, कोथरुड), महेश कालीदास परीट (वय-१९ रा. जयभवानी नगर, कोथरुड), योगेश प्रकाश कानगुडे (वय-२४ रा. शिवकल्याण नगर, कोथरुड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी हॉटेल व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. त्यांच्याकडून ५१ हजार रुपये किंमतीचे चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

आरोपींनी हॉटेल व्यावसायिकाला प्रत्यक्ष भेटून आणि फोन करून खंडणी मागितली. तुमच्याकडे नेहमी माल येत असतो. तो आमच्या कामगारांकडून खाली करून घ्यायचा नाही. माल खाली करून घेयचा असेल तर दरमहा १८ हजार रुपये हप्ता द्यावा लागेल. हप्ता दिला नाहीतर हॉटेल चालू देणार. तसेच जीवे मारण्याची धमकी हॉटेल मालक आणि व्यवस्थापकाला वारंवार देऊन खंडणीची मागणी करत होते. याप्रकरणी हॉटेल व्यावसायिकाने तक्रार दिल्यानंतर पोलीस आरोपींच्या शोधात होते. आरोपी वारजे माळवाडी येथे असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपी पैकी ओम धर्मजिज्ञासू याच्यावर कोथरूड पोलीस ठाण्यात २००९ साली खुनाचा एक गुन्हा, २०१५ साली दुखापतीचा एक गुन्हा भारती विद्यापीठात तर २०१७ मध्ये पिस्टल बाळगल्याचा एक असे तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो माथाडी कामगार संघटनेचा पुणे जिल्हा अध्यक्ष व ललीत काकडे हा उपाध्यक्ष म्हणून काम करत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस उप निरीक्षक किरण अडागळे, संजय गायकवाड, राजकुमार केंद्रे, पोलीस कर्मचारी अनिल शिंदे, किशोर शिंदे, रामदास गोणते, संदीप तळेकर, दत्तात्रय गरुड, संदिप राठोड, प्रविण तापकीर, संतोष क्षिरसागर, गजानन गानबोटे, सचिन गायकवाड यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like