Coronavirus ! सांगलीत एकाच कुटूंबातील चौघांना ‘कोरोना’ची लागण, राज्यातील रूग्णांची संख्या 97 वर

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची दिवसेंदिवस वाढ होत असून परिस्थती गंभीर होत चालली आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये कोरोनाचे चार रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 97 वर पोहचली आहे. चार जणांचे रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे हे चौघे एकाच कुटुंबातील आहेत.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मधील चारजण सौदी अरेबिया येथे गेले होते. सौदी अरेबियात हज यात्रेसाठी हे सर्वजण गेले होते. सौदी अरेबियातून आल्यानंतर क्वारंटाईन सेंटरमध्ये होते. चौघांचे रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आले आहेत. एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने इस्लामपूरसह सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या चौघांवर मिरजच्या सिव्हिल हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहे.
राज्यात आणि देशात कोरोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन शासन आणि प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मात्र, परिस्थिती गंभीर असतानाही लोक लॉक डाऊनची बंधने झुगारून घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. त्यामुळे राज्य सरकारने कठोर निर्णय घेतला असून राज्य सरकारने संचारबंदीची घोषणा केली आहे. तसेच राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.