लिफ्ट देऊन चौघांनी तरुणाला लुटले 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – लिफ्ट घेऊन कारने पुण्याहून मुंबईला जाताना तरुणाला चौघांनी लुटून सोडून दिल्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

रोहित महेश कारेकर (26) याने फिर्याद दिली असून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित हा वाकड पूलावर मुंबईला जाणारी बस पकडण्यासाठी थांबला होता. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास एक कार त्याच्याजवळ येऊन थांबली. कार चालकाने आपण मुंबईच्या दिशेने चाललो असून तुलाही तिथे सोडतो असे सांगितले. कारमध्ये आधीपासूनच चारजण बसले होते. रोहित कारमध्ये बसला. उर्से टोल नाका ओलांडल्यानंतर कार मधील चौघांनी धारदार शस्त्राच्या धाक दाखवून रोहितला चांदीचे ब्रेसलेट, चैन काढायला लावली. त्याचा मोबाइल फोन आणि डेबिट कार्ड काढून घेतले व कार्डाचा पिन नंबरही त्याच्याकडून वदवून घेतला. आरोपींनी कार पुण्याच्यादिशेने वळवली व रोहितला ताथवडे कॉलेजजवळ सोडून दिले. आरोपींनी रोहितच्या डेबिट कार्डचा वापर करुन त्याच्या खात्यातून २६ हजार रुपये काढून घेतले. तपास हिंजवडी पोलिस करत आहेत.