पर्यटनासाठी आलेले चार जण पालघरच्या समुद्रात बुडाले, एकाचा मृतदेह हाती

पालघरः पोलीसनामा आॅनलाइन
पालघरच्या केळवे समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेले चार पर्यटक बुडाल्याची घटना रविवार (दि.17 जून) रोजी घडली आहे. बुडालेले चारही पर्यटक नालासोपारा येथील रहिवाशी आहेत. सदरची घटना आज दुपारी दोन-अडीचच्या सुमारास घडली. बुडालेल्या चाैघांपैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. तर इतर तिघांचा शोध सुरू आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शनिवार व रविवार सलग दोन दिवस सुट्या आल्यामुळे हे सर्व पर्यटक सुट्यांचा आनंद लुटण्यासाठी केळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दादरा पाडा समुद्र किनारी आले होते. त्यामध्ये संतोष भुवन नालासोपारा पूर्व येथील  गौरव भिकाजी सावंत (वय १७), संकेत सचिन जोगले (१७), देविदास रमेश जाधव (१६), दिपक परशुराम चालचाडी (२०), दिपेश दिलीप पेडणेकर (१७), श्रीतेज नाईक (१५), तुषार चिपटे (१५) ही ७ मुले देखील पर्यटनासाठी आली होती.  दुपारी अडीचच्या दरम्यान हे सर्वजण समुद्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र यामधील चार जण समुद्रात बुडाले. यातील दिपक चालवाडीचा मृतदेह हाती लागला आहे. तर दिपेश पेडणेकर, श्रीतेज नाईक आणि तुषार चिपटे यांचा शोध सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.