जुगार खेळणारे 4 पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबीत

परभणी (जिंतूर) : पोलीसनामा ऑनलाइन – जिंतूर शहरातील येलदरी रस्त्यावरील पोलीस वसाहतीमध्ये एका घरात जुगार खेळणाऱ्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी श्रवण दत्त यांनी 28 सप्टेंबर रोजी कारवाई केली होती. या चार पोलीस कर्मचाऱ्यांना आज (मंगळवार) जिल्हा पोलीस प्रमुखांनी निलंबित केले आहे.

पांडुरंग तुपसुंदर, किशोर भूमकर, त्र्यंबक बडे, अशोक हिंगे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उप विभागीय पोलीस अधिकाऱ्याची बदली होऊन त्यांच्या जागी आयपीएस श्रवण दत्त हे प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी म्हणून रुजू झाले आहेत. 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास काही पोलीस कर्मचारी पोलीस वसाहतीमधील एका घरात पत्ते खेळत असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीवरून श्रवण दत्त यांनी त्या घरावर धाड टाकली असता चारजण जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून दीड हजार रुपयांची रोकड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. तसेच जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठवला. यावरू आज जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी चारही पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाही केली. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Visit : Policenama.com