‘त्या’ प्रकरणातील ४ दोषी पोलीस कर्मचारी तडकाफडकी बडतर्फ

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – सराफ व्यापाऱ्याकडून आचारसंहितेची भिती दाखवून पैसे उकळल्याप्रकऱणी दोषी आढळल्यानंतर गुन्हा दाखल झालेल्या उदगीर शहर पोलीस ठाण्यातील चारही पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले आहे. चौघांना अटक केल्यानंतर पोलीस अधिक्षक डॉ. राजेंद्र माने यांनी त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश दिले आहेत. श्रीहरी डावरगावे, महेश खेळगे, शाम बडे, रमेश बिरले अशी चौघांची नावे आहेत.

सचिन बालाजी चन्नावार यांचे उदगीर शहरातील सराफ लाईन भागात ‘श्री बालाजी ज्वेलर्स’ नावाचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. काल रात्री साडेआठच्या सुमारास दुकान बंद करुन ते दिवसभरात जमलेली सहा लाखांची रोकड घेऊन घराकडे जात होते. उदगीर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी श्रीहरी डावरगावे, महेश खेळगे, शाम बडे, रमेश बिरले यांनी चन्नावार यांना अडवले. शिवाजी चौकातून शाहू चौकाकडे घेऊन जाऊन तेथील एका दुकानामध्ये त्यांना बसवण्यात आले. सहा लाख रुपये जप्त करायचे आहेत असे सांगून त्यांना चार तास दुकानात बसवून ठेवले. चार तासानंतर या चार पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडील सहा लाख रुपयांपैकी दीड लाख रुपये घेऊन उर्वरीत रक्कम त्यांना परत करुन सोडून दिले.

सचिन चन्नावार यांनी याची तक्रार थेट विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे केली असून संबंधितावर कारवाई करावी व आपली रक्कम आपल्याला परत मिळवून द्यावी अशी मागणी केली होती. दरम्यान या घटनेने लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर केलेल्या चौकशीत चौघे दोषी आढळून आले. त्यानंतर त्यांच्यावर उदगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली होती. याप्रकऱणी चौघांचेही कृत्य पोलीस दलाच्या कामकाजाला घात पोहोचविणारे असून गुन्हेगारी व बेजबाबदारपणाचे आहे. असे निदर्शनास आल्याने त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक डॉ. राजेंद्र माने यांनी दिले आहेत.