पोलीस ठाण्यातच पोलीसांचा राडा, ४ पोलीस तडकाफडकी निलंबीत

उमरगा (उस्मानाबाद) : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस ठाण्यातील एका सहकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसी शिस्तीचे धिंडवडे काढल्याने पोलीस अधीक्षक आर. राज यांनी आरोपी, फिर्यादी यांना निलंबीत केले आहे. हा प्रकार शनिवारी (दि.२) रात्री उमरगा पोलीस ठाण्यात घडला होता.

पोलिस नाईक राजुदास सिताराम राठोड, पोलिस कर्मचारी लाखन सुभाष गायकवाड, मयुर राजाराम बेले, सिध्देश्वर प्रकाश शिंदे असे निलंबीत करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. तर गणेश कांबळे या खासगी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमरगा पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक राजुदास सिताराम राठोड हे शनिवारी रात्री उशीरा ठाण्यातील आपल्या उत्तर बिट मधील खोलीत काम करत बसले होते. त्यावेळी रहा ठाण्यातील पोलिस कर्मचारी लखन गायकवाड, मयुर बेले, सिध्देश्वर शिंदे व त्यांचा खासगी वाहनचालक गणेश कांबळे हे आले. त्यांनी धारदार शस्त्राने तसेच काठीने मारहाण करत, तुला जिवंत सोडणार नाही म्हणत राठोड यांना जबर मारहाण केली.

या मारहाणीत पोलिस नाईक राठोड हे गंभीर झाले असून त्यांच्यावर उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या जबाबावरून उमरगा पोलिस ठाण्यात चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक राजा यांनी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली. त्यांचा अहवाल आल्यानंतर पोलिस खात्याची शिस्त माहिती असूनही त्यांनी बेशिस्त वर्तन केले, खात्याची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत आरोपी तसेच फिर्यादी अशा चारही पोलिस कर्मचार्‍यांना निलंबीत केले.