पत्याच्या क्लबवरील छाप्यातील लाखो रुपये गायब करणारे ४ पोलीस तडकाफडकी निलंबीत

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – उच्चभ्रू वस्तीतील घरात सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबवर छापा टाकून लाखो रुपये जप्त केले होते. मात्र, जप्त केलेल्या पैशांपैकी काही रक्कम गायब केल्याचा ठपका ठेवत जळगाव पोलीस दलातील चार पोलीसंना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी शनिवारी सायंकाळी ही कारवाई केली. हा प्रकार अक्षतृतीयेच्या पूर्वसंध्येला घडला होता. एकाच वेळीच चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत केल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

धरणगाव पोलीस ठाण्यातील शिवाजी बाविस्कर, चोपडा शहर पोलीस ठाण्यातील संतोष पारधी, हितेश बेहरे आणि चोपडा उपविभागीय कार्य़ालयातील वाहन चालक तुषार साळुंखे अशी निलंबीत करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
अक्षयतृतीयेच्या पूर्वसंध्येला धरणगाव आणि चोपडा शहरातील चार आणि अडावद येथील एका ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला होता. पोलिसांनी धरणगाव येथे टाकलेल्या छाप्यामध्ये तब्बल १० ते १५ लाख रुपयांची रोकड आढळली होती. मात्र, निलंबीत करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अवघे पावणे तीन लाख रुपये जप्त केल्याचे कागदोपत्री दाखवले. उर्वरीत रक्कम या चौघांनी गायब केली. उर्वरीत रक्कमेची माहिती समोर येत नसल्याने संशय व्यक्त केला जात होता. या प्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलीस उपअधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी चौकशी केली. पोलीस उपअधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी चौकशी अहवाल पोलीस अधीक्षकांना पाठवला. त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी या चार पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन केले.

Loading...
You might also like