…म्हणून हिंदी महासागरात भारताचा ‘दबदबा’ वाढणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय नौदलाचा हिंदी महासागर क्षेत्रातील दबदबा आणखी वाढणार आहे. पुढच्या वर्षभरात भारताच्या ताफ्यात पी-8 आय या बहुउपयोगी विमानांचा समावेश होणार आहे. अमेरिकन बनावटीची आणखी चार विशेष विमाने पुढच्यावर्षीपर्यंत नौदलाला मिळणार आहेत. पी-8 आय या विमानांमध्ये लांब अंतरावरुन शत्रुच्या पाणबुडीचा अचूक वेध घेण्याची, टेहळणीची आणि इलेक्ट्रॉनिक जॅमिंगची क्षमता आहे.

बोईंगकडून अशी आणखी सहा विमाने घेण्याचा भारताकडे पर्याय आहे. यासंबंधी 2021 वाटाघाटी सुरु होऊ शकतात. या घडामोडींशी संबंधित असलेल्या नवी दिल्ली आणि सिएटलमधील सूत्रांनी ही माहिती दिली. समुद्री गस्त घालण्याबरोबरच पाणबुडीवर अचूक प्रहार करण्यासाठी सुद्धा हे विमान सक्षम आहे. हारपून ब्लॉक 2 मिसाइल आणि हलक्या टॉरपीडोस सुद्धा या विमानामध्ये आहेत. पाणबुडी बरोबर जहाजविरोधी क्षेपणास्त्र सुद्धा या विमानावरुन डागता येऊ शकते. टेहळणी, शत्रू प्रदेशाची माहिती गोळा करण्याबरोबरच शत्रुच्या पाणबुडया, जहाजांना जलसमाधी देण्याच्या विविध रणनितीक दृष्टीने बोईंगने या विमानांची निर्मिती केली आहे.

समुद्राशिवाय अन्यत्र सुद्धा या विमानाचा वापर करता येऊ शकतो. 2017 डोकलाम संघर्षाच्यावेळी आणि आता पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ चीनच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सुद्धा या विमानाचा वापर होत आहे. 2,200 किमी या विमानाची रेंज असून प्रतितास 789 किमी या वेगाने हे विमान उड्डाण करु शकते. भारतीय नौदलासाठी ही विमाने अत्यावश्यक आहेत.