व्हॉट्सअ‍ॅप वापरताना ‘ही’ काळजी घ्या अन्यथा अकाउंट होऊ शकते ब्लॉक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजकीय प्रचारासाठी सोशल मीडिया हे एक प्रभावशाली माध्यम बनले आहे. सोशल नेटवर्किंग साइटपैकी व्हॉट्सॲपवर सर्वात जास्त प्रचार होताना दिसून येत आहे. मात्र या प्रचाराबरोबरच अनेक फेक न्यूजही पसरवल्या जात आहेत. या गोष्टींना आळा घालण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपनेही काही फोन नंबर ब्लॉक केले आहे. तसेच काही युजर्सचे चॅट फीचरही बंद केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप वापरताना खालील काळजी घ्या अन्यथा तुमचेही अकाउंट होऊ शकते ब्लॉक –

१ ) जर तुम्ही एखाद्या युजरला त्याला नको असलेला व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवला आणि त्याने तुमच्या मेसेजला रिपोर्ट केल्यास तुमचे अकाऊंट बंद होऊ शकते. अनऑथराइज्ड आणि ऑटोमेटेड मेसेज पाठवणारे अकाऊंट अथवा ग्रुप तयार करू नका. तसेच व्हॉट्सअ‍ॅपचं मॉडिफाइड व्हर्जन वापरू नका.

२ ) व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून अश्लील, द्वेष निर्माण करणारे मेसेज, धमकी देणारे मेसेज पाठवण्यास मनाई आहे. अशाप्रकारे मेसेज पाठवल्यास ते नियमांचे उल्लंघन असते. त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल व्हॉट्सअ‍ॅप तुमचे अकाऊंट बंद करू शकते.

३ ) अनोळखी लोकांना वारंवार ब्रॉडकास्ट मेसेज तुम्ही पाठवत असाल तर तुमचा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक रिपोर्ट होऊ शकतो. अशावेळी व्हॉट्सअ‍ॅप तुमचं अकाऊंट ब्लॉक करू शकतं. व्हॉट्सअ‍ॅपचे अनेक युजर्स ब्रॉडकास्ट मेसेज पाठवतात. तुमचा फोन क्रमांक ज्यांना मेसेज पाठवू इच्छिता त्या युजर्सकडे सेव्ह असेल तर त्यांना ब्रॉडकास्ट मेसेज मिळणार आहे अन्यथा मिळणार नाही.

४ ) अनोळखी व्यक्तींचे व्हॉट्सअ‍ॅप नंबर ग्रुपमध्ये अ‍ॅड केल्यास तुमचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर ब्लॉक केला जाऊ शकतो. व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांच्या क्रमांकांची यादीची विक्री काही मार्केटिंग संस्थांकडून करण्यात येते. अशा फोन क्रमांकांची यादी बनवून एखाद्याच्या परवानगीशिवाय नंबर वापरल्यास व्हॉट्सअ‍ॅप तुम्हाला ब्लॉक करू शकतं. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या परवानगीशिवाय त्याचा नंबर वापरू नका किंवा त्यांना मेसेज करू नका.