दुर्दैवी ! खेळताना फुगा गिळल्यामुळे 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  खेळताना फुगा गिळल्यामुळे एका 4 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अंधेरी परिसरात घडली. देवराज सूरज नाग, असे या मृत मुलाचं नाव आहे.

देवराज फुग्यात हवा भरत होता. यावेळी फुगा त्याच्या घशात गेला. आई-वडिलांच्या लक्षात आल्यानंतर त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेले. पण, तोपर्यंत फुफ्फुस काम करत नव्हते. यातच श्वास कोंडल्यानं देवराजचा अखेर दुर्दैवी मृत्यू झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी, आई-वडील रात्री घरात जेवत असताना देवराज आपल्या दोन भावंडाबरोबर खेळत होता. फुग्यात हवा भरत होता. यावेळी हवा भरलेला फुगा देवराजच्या घशात गेला. ही बाब देवराजच्या आई-वडिलांच्या लक्षात आली. त्यांनी त्याच्या घशातील फुगा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र फुगा निघाला नाही.

देवराजला जवळच असलेल्या हॉस्पिटलकडे नेले. त्याला अगोदर पटेल हॉस्पिटलमध्ये नेले. पण, इमर्जन्सी केस म्हणून क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये नेलं. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने डॉक्टरांनी त्याला नानावटी रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. तोपर्यंत देवराजचे फुफ्फुसाचं काम थांबल होतं. नानावटी हॉस्पिटलमध्ये तासभर प्रयत्न करूनही देवराजला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले नाही. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. देवराजचे कुपर रुग्णालयात शवविच्छेदन केले. या प्रकरणी अंधेरी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली.

नाशिकमध्येही घडली होती अशीच घटना :

दरम्यान, नाशिक शहरातील हनुमान चौक परिसरामध्येदेखील काही महिन्यांपूर्वी अशी घटना घडली होती. वीर विनोद जयस्वाल असे या मृत चिमुकल्याचं नाव आहे. सकाळी चिमुकला वीर फुग्यासोबत खेळत होता. अचानक त्याने फुगा गिळला. त्यामुळे त्याचा श्वास रोखला. फुगा गिळल्याचे कळताच वीरच्या वडिलांनी मुलाला तात्काळ खासगी रुग्णालयात नेले. मात्र, तिथून त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.