नाशिकच्या इतिहासातील पहिलीच घटना, 4 तरुण एकाच वेळी झाले लष्करातील अधिकारी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन –   नाशिकच्या (Nashik) इतिहासातील पहिली आणि एतिहासिक घटना घडली आहे. नाशिकमधील चार तरुण (four young men) एकाचवेळी लष्करात अधिकारी (Army Officers) बनले आहेत. डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमीत (Indian Military Academy Dehradun) शनिवारी (दि.12) झालेल्या दिक्षान्त समारंभात नाशिकचे तीन युवक भारतीय लष्करात अधिकारी बनून लेप्टनंट पदावर रुजू झाले. अनुग्रह देशमुख, उर्मिल टर्ले आणि शाहू काळे अशी त्यांची नावे आहेत. याशिवाय नाशिकचा रहिवासी असलेला उत्कर्ष दिवाने नौदलात अधिकारी बनून सबलेफ्टनंट पदावर रुजू झाला आहे.

अनुग्रह देशमुख हा नाशिक रोडचा रहिवासी आहे. तो के.एन.केला शाळेचा माजी विद्यार्थी आहे. त्याने बारावीपर्यंतचे शिक्षण नाशिक रोडच्या बिटको महाविद्यालयातून, तर अभियांत्रिकीची पदवी आर.एच. सपट महाविद्यालयातून प्रथम श्रेणीतून पूर्ण केली. त्याचे वडील श्यामराव देशमुख हे व्यावसायिक आहेत तर आई रेवती यांचा ब्यूटिपार्लरचा व्यवसाय आहे. अनुग्रह लष्करात गोरखा रेजिमेंटमध्ये दाखल होणार आहे.

उर्मिल टर्ले हा गोविंदनगरचा रहिवासी असून, न्यू एरा शाळेचा माजी विद्यार्थी आहे. त्याचे बारावी पर्यंतचे शिक्षण पंचवटी महाविद्यालयातून, तर पदवीचे शिक्षण नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमीतून झाले. त्याचे वडील दत्ता टर्ले व्यावसायिक असून, आई सुवर्णा महिंद्रा फायनान्समध्ये व्यवस्थापक आहे. तो लष्करात जाट रेजिमेंटमध्ये दाखल होत आहे.

नौदल अधिकारी उत्कर्ष दिवाने हा सावरकर नगरचा रहिवासी आहे. तो सिम्बायोसिस शाळेचा माजी विद्यार्थी आहे. त्याचे बारावीपर्यंतचे शिक्षण आरवायके महाविद्यालयातून, तर पदवीचे शिक्षण नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमीतून झाले. त्याचे वडील मिलिंद दिवाने हे आर्थिक सल्लागार असून आणि सुहासिनी दिवाने प्राध्यापिका आहेत.

शाहू काळे हा हिरावाडी येथील रहिवासी असून, स्वामिनारायण शाळेचा माजी विद्यार्थी आहे. त्याचे बारावी पर्यंतचे शिक्षण भोसला महाविद्यालयातून, तर पदवीचे शिक्षण नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमीतून झाले. त्याचे वडील संजय काळ हे व्यावसायिक असून आई संध्या काळे या गृहिणी आहेत. शाहूचे आजोबा कै. किसनराव काळे भारतीय लष्करात सेवा देताना 1962, 1965 आणि 1971 च्या युद्धात सहभागी झाले होते. त्याने आपल्या आजोबांचा आदर्श घेत सैन्य दलात दाखल झाला आहे. शाहू अधिकारी बनून लष्कराच्या ग्रेनेडिअर्स रिजिमेंटमध्ये दाखल होत आहे.