मौजमजेसाठी दुचाकी चोरणारे कंत्राटी कर्मचारी जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मौजमजेसाठी शहराच्या मध्यवस्तीतील दुचाकी चोरणाऱ्या चौघांना फरासखाना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून एकूण ७ लाखांच्या १६ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे चौघेही ससूनमध्ये सफाई कामगार व सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते.

किरण रमेश गालफाडे (२१, मंगळवार पेठ), सौरभ अनुद अठवाल२३, मंगळवार पेठ), लक्ष्मण शाम मोरे (२२, मंगळवार पेठ), सोनु धर्मेंद्र रजपुत (२५, लोहगाव मुळ राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरासखाना पोलीस ठाण्याचे तपास पथक गस्त घालत असताना पोलीस कॉन्सटेबल अमेय रसाळ यांना किरण गालफाडे, सौरभ अठवाल, लक्ष्मण मोरे, सोनु रजपुत या चौघांनी शहर व परिसरातून दुचाकी चोरी केल्या असल्याची माहिती बातमीदाराकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चौघांनाही सापळा रचून वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी शहर व परिसरातून १६ दुचाकी वाहने चोरली असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यांच्याकडून फरासखाना पोलीस ठाण्यातील १०, बंडगार्डन २, भारती विद्यापीठ, खडक, विश्रामबाग, लोणीकंद पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे १६ गुन्हे उघडकिस आणले. त्यानंतर त्यांच्याकडून पोलिसांनी ७ लाख रुपये किंमतीच्या एकूण १६ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून वाहने घेणाऱ्यांना पोलिसांनी नोटीसा दिल्या आहेत.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त प्रदिप आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, पोलीस निरीक्षक संभाजी शिर्के, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील, कर्मचारी बापूसाहेब खुटवड, केदार आढाव, दिनेश भांदुर्गे, अमोल सरडे, विकास बोऱ्हाडे, शंकर कुंभार, सयाजी चव्हाण, हर्षल शिंदे, महावीर वलटे, मोहन दळवी, आकाश वाल्मिकी, अमेय रसाळ यांच्या पथकाने केली.