1400 पोलिसांवर ‘घोर’ अन्याय ! PSI च्या अंतिम परीक्षेच्या निकालास दिरंगाई; MPSC आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची ‘टोलवाटोलवी’ ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) खातेअंतर्गत पोलिस उपनिरीक्षक पदासाठी पूर्व व मुख्य परिक्षा घेण्यात आली. त्यानंतर मैदानी चाचणी घेण्यात आली. परंतु अंतिम परीक्षेचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे 1469 उमेदवारांना रुखरुख लागून राहिली आहे. त्यानंतर 2018 साली थेट पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा झालेले उमेदवार निकाल लागुन त्यांना ट्रेनिंग साठी एप्रिल 2021 ची तारीख देण्यात आली आहे. ते आमच्या नंतर परीक्षा होऊन देखील आम्हाला सिनियर होत आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी असून यामध्ये सरकारने लक्ष घालून उमेदवारांना न्याय द्यावा अशी मागणी पात्र उमेदवारांकडून होत आहे.

पोलीस दलात खातेअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी 2017 मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली होती. या पदांसाठी 10 सप्टेंबर रोजी पूर्व परीक्षा झाली. यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची 24 डिसेंबर 2017 रोजी मुख्य परीक्षा झाली. यामध्ये 1 हजार 469 जण पात्र ठरले. त्यांची मैदानी चाचणी होऊन उपनिरीक्षकपदाची प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते. पात्र ठरलेल्या 1469 उमेदवारांपैकी 1100 उमेदवरांची शारिरीक चाचणी 18 मार्च 2020 पर्यंत पूर्ण करण्यात आली. मात्र, कोरोनामुळे उर्वरीत उमेदवारांची शारिरीक चाचणी पुढे ढकलण्यात आली.

यानंतर उर्वरीत उमेदवारांची शारिरीक चाचणी 8 डिसेंबर 2020 पर्यंत पर्ण करण्यात आली. जाहिरात प्रसिद्ध होऊन चार वर्षे झाली तरी अद्याप या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. असे असताना 2018 मध्ये थेट पोलिस उपनिरीक्ष पदाची परीक्षा दिलेल्या उमेदवारांचा निकाल लागून त्यांना ट्रेनिंगसाठी एप्रिल 2021 ची तारीख देण्यात आली आहे. 2017 मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना डावलून 2018 मध्ये पात्र झालेल्या उमेदवारांना ट्रेनिंग दिले जात आहे. यामुळे 2017 मध्ये पात्र ठरुन देखील 2018 मधील उमेदवार सिनीयर होत आहेत.

त्यामुळे दिवस रात्र काम करून परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार हे मानसिक दबावाखाली आहेत. लोकसेवा आयोगाच्या या भोंगळ कारभाराचा उमेदवारांवर खूप मोठा परिणाम होत आहे. तसेच या भोंगळ कारभारामुळे आमच्यावर खूप मोठा अन्याय होत आहे. त्यामुळे सर्व उमेदवार हे चिंताग्रस्त झालेले असून अंतिम परीक्षेच्या निकालाची वाट पाहात आहेत. तरी सदर परीक्षेचा अंतिम निकाल त्वरीत लावुन न्याय मिळवून द्यावा अशी विनंती पात्र उमेदवारांनी केली आहे.