Coronavirus : मुंबईसाठी धोक्याचा इशारा, धारावीत सापडला चौथा रुग्ण

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना विषाणूचा वाढत्या फैलावामुळे राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढू लागला असून कोरोनाबाधितांचा आकडा 537 वर पोहचला आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या सरकारची चिंता वाढवणारी आहे. अशातच आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत कोरोनाचा चौथा रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. धारावीत कोरोनाचं संक्रमण वाढलं तर कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढू शकते. त्यानंतर हे रोखणं सरकारसमोर मोठं आव्हान असणार आहे.
धारावीत कोरोनाचा चौथा रुग्ण आढळल्याने मुंबईसाठी धोक्याचा इशारा मानला जात आहे. धारावी येथील बलिगा नगरमध्ये आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. 30 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समजतेय. दिल्लीच्या मरकजसाठी गेलेले पाचजण धारावीत गेले होते. ते पाचही जण धारावीत राहिले होते. ज्याच्या फ्लॅटमध्ये हे लोक राहिले त्याचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दोन ते तीन दिवसांच्या कालावधीत मरकजहून आलेल्या पाच जणांचा संपर्क किमान 100 जणांशी आला होता, अशी माहिती मिळत आहे.

धारावीत आलेले तबलीगी जमातचे पाच लोक नंतर केरळला गेले. त्यांच्या संपर्कात आलेल्या धारावीत राहणाऱ्या 59 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आणि त्याचाही मृत्यू झाला. आता याच बलिगा नगर येथील एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती समोर आली आहे. अशातच धारावीत आता चौथा रुग्ण आढळल्याने चिंता आणखी वाढली आहे.

आज मुंबईत 28 ठाणे 15, अमरावती 1, पुणे 2, पिंपरी-चिंचवड 1, अशा एकूण 47 नव्या रुग्णांची नोंद झाली. राज्यातील एकूण रुग्णांच्या संख्येवर नजर टाकल्यास मुंबईत सर्वाधिक 306, पुण्यात 73, ठाणे आणि एमएमआर परिसरात 70, सांगली 25, अहमदनगर 20, नागपूर 16, बुलढाणा 5, यवतमाळ 4, सातारा आणि औरंगाबादमध्ये प्रत्येकी 3, कोल्हापूर आणि रत्नागिरी प्रत्येकी 2 आणि सिंदुदुर्ग, गोंदिया, नाशिक, उस्मानाबाद, वाशीम, जळगाव आणि अमरावती येथे प्रत्येकी एका कोरोनाबाधिताची नोंद झाली आहे.