सुशिक्षीत बेरोजगारांसाठी खुशखबर ! ‘ही’ परदेशी कंपनी भारतात देणार 30000 नोकर्‍या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फ्रेंच तंत्रज्ञान कंपनी कॅपजेमिनी यावर्षी भारतात ३०,००० कर्मचार्‍यांना कामावर घेणार आहे. भारतात सध्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या १,१५,००० आहे. कंपनीने म्हटले आहे की भारतातील आपल्या उपस्थितीचा अजून फायदा करून घ्यायचा आहे. भारतातील कंपनीचे मुख्य कार्यकारी अश्विन यार्डी म्हणाले की, या नियुक्त्या नवीन लोक, अनुभवी व्यावसायिक आणि मध्यम पदांसह विविध स्तरावर होतील.

जागतिक स्तरावर कंपनीच्या एकूण कर्मचार्‍यांपैकी निम्मे कर्मचारी भारतात कार्यरत आहेत. यार्डी म्हणाले, ‘भारत हा आमच्या व्यवसायाचा एक महत्त्वाचा भाग आहे. यावर्षी आम्ही एकूण २५,००० ते ३०,००० कर्मचार्‍यांची भरती करू.’

ते म्हणाले की, सध्या कंपनी आपल्या कर्मचार्‍यांच्या भविष्यातील तंत्रज्ञानाचे अनुकूल कौशल्य प्रदान करण्यावर भर देत आहे. ते म्हणाले की आता ही एक सतत प्रक्रिया बनली आहे. यार्दी म्हणाले की, ३० वर्षांखालील तरुण शिकण्यास खूप उत्सुक असतात. कंपनीच्या कर्मचार्‍यांपैकी ६५ टक्के काम ते करतात. १० ते १५ वर्षाचा अनुभव असणार्‍या मध्यमस्तरीय व्यवस्थापकांसाठी कंपनी विशेष कार्यक्रम आयोजित करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मायक्रोसॉफ्ट दिव्यांगांना नोकऱ्यांसाठी देणार प्रशिक्षण
मायक्रोसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीने दिव्यांगांना रोजगार कार्यक्रमांचे प्रशिक्षण देण्याची घोषणा केली आहे. मायक्रोसॉफ्ट ने स्टेट बँक ऑफ इंडिया सोबत मिळून अपंगांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरुन अपंगांना बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रात रोजगार मिळू शकेल. एसबीआयचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली आहे. या कराराअंतर्गत पहिल्या वर्षात ५०० हून अधिक दिव्यांगांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.