काय सांगता ! होय, कोरोना व्हायरसमुळं फ्रान्सच्या पंतप्रधानांचा राजीनामा

पॅरिस : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना संसर्गाच्या नंतर आर्थिक संकटात सापडलेल्या फ्रान्सला सावरु न शकल्याने पंतप्रधान एडवर्ड फिलीप यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्राध्यक्ष इम्युनेल मॅक्रोन यांनी फिलीप यांचा राजीनामा मंजूर केला आहे. गेल्या ३ वर्षांपासून ते पंतप्रधानपदी होते.

फ्रान्समध्ये कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला असून आतापर्यंत २९८७५ जणांचा बळी गेला आहे. जगातील सर्वाधिक मृत्युदर हा फ्रान्समधला आहे. तिथे प्रत्येकी १०० रुग्णांमागे १७ हुन अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे फ्रान्समध्ये या संसर्गाबाबत मोठी दहशत पसरली आणि आधीच आर्थिक संकटात सापडलेला देश ठप्प झाला. अजून सुद्धा फ्रान्सला आर्थिक संकटातून बाहेर येण्याचा मार्ग सापडला नाही. या कारणामुळे एडवर्ड फिलीप यांनी आपला राजीनामा दिला. त्यांच्या पक्षाचे राष्ट्राध्यक्ष इम्युनेल मॅक्रॉन यांनी तो तातडीने स्वीकारला.

राष्ट्राध्यक्ष असलेल्या मॅक्रॉन यांना आपली आणि आपल्या पक्षाची प्रतिमा सुधारण्याची आवश्यकता असल्यामुळे त्यांनी तातडीने फिलीप यांचा राजीनामा मंजूर केल्याची चर्चा आहे. पुढील काही तासांमध्ये मॅक्रॉन फ्रान्सच्या नव्या पंतप्रधानांचे नाव घोषित करण्याची शक्यता आहे. आता पुढच्या २ वर्षांसाठी फ्रान्सला नवा पंतप्रधान मिळेल. अलीकडेच झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये मॅक्रॉन यांच्या पक्षाची सगळीकडे हार झाली असल्यामुळे मंत्रिमंडळामध्ये फेररचना अपेक्षितच होती. म्हणून आता पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी नेतृत्व बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.