महागाईविरोधात फ्रान्समध्ये जनक्षोभ, अनेक ठिकाणी हिंसक वळण

पॅरिस : वृत्तसंस्था – वाढणारे इंधनदर आणि त्यामुळे महागाईचा उसळलेला आगडोंब यामुळे फ्रान्समधील नागरिक प्रचंड संतापले आहेत. मागील काही दिवसांपासून यलो वेस्ट मूव्हमेंट हे आंदोलन येथील नागरिक करत आहेत. परंतु, आता या आंदोलनाने हिंसक वळण घेतले असून सर्वत्र दंगलीसारखे प्रकार घडू लागले आहेत. परिस्थिती हाताबाहेर चालल्याने येथे कधीही आणीबाणी लागू केली जाऊ शकते, अशी परिस्थिती आहे. संतापलेल्या तरूणांनी पॅरिसमध्ये तोंडावर रूमाल बांधून वाहने आणि इमारतींची प्रचंड जाळपोळ केली.

शहरातील अनेक भाग या दंगलीत होरपळून निघाले आहेत. नागरिकांनी पोलिसांच्या गाडय़ाही जाळल्या. या दंगलीत आतापर्यंत १३३ नागरिकांसह २३ पोलीस जखमी झाले आहेत. पोलिसांनी ४१२ नागरिकांना अटक केली आहे. रविवारी पॅरिस वगळता फ्रान्सच्या अन्य काही भागांमध्येही हिंसाचार सुरू झाला होता. दक्षिण फ्रान्समध्ये निदर्शकांनी रस्त्यावरील एक बिल भरणा केंद्र पेटवून दिले. पूर्व फ्रान्समधील मुख्य उत्तर-दक्षिण महामार्गावर निदर्शकांनी ठाण मांडले होते. अन्य काही मार्गही आंदोलकांनी रोखून धरल्याने त्यांना हटवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराची नळकांडी फोडली. नागरिकांच्या या संतापाच्या भडक्यात फॅशन आणि कलेचे जागतिक केंद्र असलेले पॅरिस निघाले आहे. शहराच्या महत्त्वाच्या भागांत आंदोलकांनी अनेक वाहनांची जोळपोळ-तोडफोड केली. पोलिसांच्या गाडय़ाही पेटवून देण्यात आल्या. काही इमारतींना आग लावण्यात आली. मोठय़ा प्रमाणावर तोडफोडही करण्यात आली. राजधानी पॅरिसमध्ये रविवारी मात्र तणावपूर्ण शांतता होती.

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी फ्रान्सकडे रवाना होण्यापूर्वी ब्युनॉस आयर्स येथे घेतलेल्या पत्रकार परिषद घेतली व नागरिकांना इशारा दिला आहे. मॅक्रॉन म्हणाले, सरकारी संस्था आणि यंत्रणांवरील हल्ले, लुटालूट, पत्रकार आणि कामानिमित्त बाहेर पडलेले नागरिक यांना धमकावणे अशा प्रकारांचे समर्थन करता येणार नाही. मी हिंसाचार खपवून घेणार नाही.