काय सांगता ! होय, ‘या’ देशात आरोग्य कर्मचार्‍यांना 68 कोटींची पगारवाढ

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  जगभरात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी दिवसरात्र एक करुन या संसर्ग विरुद्धच्या लढाईत आघाडीवर काम करताना दिसत आहेत. तसेच अनेक ठिकाणी रुग्णांवरती उपचार करताना अनेक डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गाची बाधा होऊन मृत्यू झाल्याचं समोर आलेआहे. जगभरातील अनेक नेत्यांनी डॉक्टरांच्या कामाचे कौतुक केलं आहे. पण फ्रान्सने कोरोना संसर्ग विरोधात लढणाऱ्या या फ्रंटलाईन योद्धांबाबत एक ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे.

फ्रान्स सरकारने देशातील सर्व डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यासाठी ८ बिलीयन युरो (६८ हजार कोटी रुपये) देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना संसर्ग माहामारीच्या दरम्यान या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाच्या मोबदल्यात एवढी मोठी रक्कम पगारवाढ म्हणून देण्यात येणार आहे.

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, देशातील सर्व कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या पगारात या निधीतून अतिरिक्त रक्कम वाढवून देण्यात येईल. देशातील प्रत्येक कर्मचाऱ्यास दरमहा सरासरी १८३ डॉलर्सची ( १३ हजार ७०० रुपये) पगारवाढ मिळणार आहे. यासंदर्भात पंतप्रधान जेन कास्टेक्स आणि कामगार मंत्री यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहे. हा करार आरोग्य यंत्रणेबाबत ऐतिहासिक निर्णय असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान कास्टेक्स यांनी म्हटलं की, ‘कोरोना संसर्गाच्या संकटाशी दोन हात करण्याच्या युद्धामध्ये आघाडीवर असलेल्या पहिल्या फळीतील योद्ध्यांचा सन्मान करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मागील अनेक वर्षांपासून रखडलेला हा निर्णय घेण्यात आला आहे. माझ्यासोबतच सर्वांचीच ही जबाबदारी आहे की या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य तो मोबदला दिला पाहिजे.”

युरोपमध्ये चीननंतर कोरोना संसर्गाचा मोठा प्रसार झाला होता. यात स्पेन, इटली आणि फ्रान्सला सर्वाधिक फटका बसला होता. या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांचा योग्य सन्मान करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप फ्रान्स मधील विरोधकांकडून करण्यात आला. तसेच नागरिकांमध्ये सुद्धा यावरुन नाराजी स्प्ष्टपणे दिसत होती. हीच नाराजी दूर करण्यासाठी सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे.