फसवणूक : पत्रकार जैन, बडतर्फ पोलिस जगताप, RTI कार्यकर्ता बर्‍हाटेसह 12 जणांवर आणखी एक FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पत्रकार, बडतर्फ पोलीस, आरटीआय कार्यकर्त्यासह 12 जणांवर आणखी एक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाम दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने 17 लाख घेतले. ते परत मागितले असता बडतर्फ पोलीस जगताप याने पिस्तुल दाखवत धमकावले असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी पत्रकार देवेंद्र जैन, बडतर्फ पोलीस शैलेश जगताप, परवेज जमादार, आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बराटे, विनय मुंदडा, मुकेश पौडवाल, धीरज जाधव, विजय काळे, प्रकाश फाले, त्याची पत्नी सविता फाले, मुलगा यश फाले अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत. याबाबत सोहन आढाव (वय 30, वानवडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक आहेत. प्रकाश फाले यांनी जीवप्रभा चॅरिटेबल ट्रस्टचा बंगला ब्रेमन चौक व शिवाजी हौसिंग सोसायटीमधील फ्लॅटचा ते स्वतः व्यवहार करत असून, या व्यवहारात रक्कम गुंतविल्यास तुम्हाला दाम दुप्पट रक्कम मिळेल असे अमिष दाखवून रोख 17 लाख रुपये घेऊन फसवणूक केली. तसेच घेतलेले पैसे परत मागितले असता फाले कुटुंबाने शिवीगाळ केली. तर जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर शैलेश जगताप याने पिस्तुल दाखवत जयेश जगताप आणि परवेज यांनी दमदाटी करत वाईट परिणाम होतील अशी धमकी दिली.

त्यानंतर विजय काळे याने तुमचे पैसे बुडणार नाहीत असे सांगत दिशाभूल करून फसवणूक केली. त्यावेळी फिर्यादी यांना लक्षात आले की प्रकाश फाले याच्यासोबत असणारे पत्रकार जैन, आरटीआय कार्यकर्ता बराटे, मुंदडा, पौडवाल व इतर हे एक रॅकेट असून, फसवणूक केली असल्याचे दिसून आले. दरम्यान बडतर्फ पोलीस, पत्रकार, आरटीआय कार्यकर्ता यांच्यावर खंडणीचे आणि फसवणूक झाल्याचे एकूण 5 गुन्हे दाखल झाले असताना आज आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे खंडणी व फसवणूकीचे सत्र सुरू असल्याचे दिसून येते.