गौतम गंभीरच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा, पुरवणी आरोपपत्र न्यायालयात सादर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फ्लॅट खरेदीदारांशी फसवणूक आणि विश्वास भंग केल्याच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी माजी क्रिकेटपटू आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार गौतम गंभीर यांच्यासह आणखी काही जणांवर दिल्ली येथील न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. २०१६ मध्ये या कंपनीच्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकल्पात ‘ब्रँड अ‍ॅम्बेसेडर’ म्हणून काम केल्याने नुकत्याच सादर केलेल्या पुरवणी आरोपपत्रात गंभीरचे नाव आले आहे.

फसवणुकीसंदर्भात पन्नासहून अधिक घर खरेदीदारांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीनुसार २०११ मध्ये त्यांनी इंदिरापुरम, गाझियाबाद येथे रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये फ्लॅट बुक केला होता. मात्र प्रकल्प पुढे चालू शकला नाही. रुद्र बिल्डवेल रियल्टी प्रायव्हेट लिमिटेड आणि एचआर इन्फ्रासिटी प्रायव्हेट लिमिटेड यांनी संयुक्तपणे सुरू केलेल्या या प्रकल्पात गंभीरने या कंपन्यांचे ‘ब्रँड अ‍ॅम्बेसेडर’ म्हणून काम केले होते.

या संदर्भात २०१६ मध्ये दोन्ही कंपन्यांच्या लोकांवर कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकल्पाच्या बांधकाम आराखड्यास मान्यता देण्याची मुदत ६ जून २०१३ रोजी संपली असल्याचे पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे.

काय आहेत आरोप :
असे असूनही, विकसकांनी जून-जुलै २०१४ पर्यंत लोकांकडून बिल्डर-खरेदीदाराचे करार करून घेतले आणि २३ जून, २०१३ नंतरही लोकांकडून अनधिकृतपणे पैसे जमा करणे सुरूच ठेवले. गुंतवणूकदारांच्या प्रस्तावित जमिनीबाबत सध्या सुरू असलेल्या कायदेशीर वादाबद्दल देखिल पोलिसांनी सांगितले. याबाबतीत गुंतवणूकदारांना मुद्दाम अंधारात ठेवले होते. गंभीर यांच्या व्यतिरिक्त मुकेश खुराना, गौतम मेहरा आणि बबिता खुराणा या कंपनीच्या प्रवर्तकांचीही आरोपपत्रात नावे आहेत.

Visit : Policenama.com