शैक्षणिक कोर्सेसला प्रवेश देण्याच्या बहाण्याने फसवणूक, पुण्यातील ‘या’ संस्थेविरोधात गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – वर्तमानपत्रात नोकरी करता शासकीय विद्यापीठांमधून कोर्सेस उपलब्ध असल्याची जाहिरात देऊन माहिती पुस्तिकेसाठी पैसे घेत कॅम्पसबाहेर जाऊन पदव्या देता येत नसताना राजस्थानातील विद्यापीठाचे खोटे प्रवेश अर्ज दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नऱ्हे येथील ‘पावर सोल इन्स्टीट्यूट’विरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अभिषेक हरिदास (३६, राहूलनगर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक हरिदास हे खासगी शिकवणी घेतात. त्यांचे पीएचडी झालेले आहे. परंतु त्यांना आपल्या शैक्षणिक पात्रता वाढविण्यासाठी एमबीएचे शिक्षण घ्यायचे होते. १४ मार्च रोजी त्यांनी एका नामांकित वर्तमान पत्रात शिक्षण विषयक या शिर्षकाखाली नोकरी करता शासकिय विद्यापीठांतून कोर्सेस उपलब्ध असल्याची जाहिरात पाहिली. पावर सोल इन्स्टीट्यूटने दिलेल्या जाहिरातीत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, भारती विद्यापीठ, पुणे विद्यापीठ व इयत्ता १० वी, १२ बोर्डाचे शैक्षणिक कोर्स उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी नऱ्ह्यातील मानाजीनगर येथे जाधवर कॉलेजजवळ असलेल्या पावर सोल इन्स्टीट्यूटशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांच्याकडून ५०० रुपये घेऊन माहिती पुस्तिका देण्यात आली. त्यांना एमबीएच्या प्रवेशासाठी रायनगर राजस्थान विद्यापीठाचा खोटा प्रवेश अर्ज दिला. मात्र कालांतराने संस्थेला कॅम्पसच्या बाहेर जाऊन अशा पदव्या देता येत नसल्याचे समोर आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी यासंदर्भात पावर सोल इन्स्टीट्यूटच्या पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जे. एस. मोहिते करत आहेत.