कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने १९ महिलांची फसवणूक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – झोपडपट्टीत राहणाऱ्या व छोटे छोटे व्यवसाय करणाऱ्या महिलांना पैशाची अडचण नेहमीच असते. प्रामाणिक असतानाही त्यांना कोणी कर्जासाठी दारात उभे करत नाही. याचा गैरफायदा घेऊन भोसरीतील लांडेवाडी झोपडपट्टी भागातील १९ महिलांची एकाने फसवणूक केली.

उमेश वासुदेव वाघमारे (वय ३८, रा. वल्लभनगर, पिंपरी) असे त्याचे नाव आहे. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अनुसया रामा बाबरे (वय ४६, रा. लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, बाबरे यांचा चहा टपरीचा व्यवसाय आहे. एक महिन्यापूर्वी उमेश वाघमारे याने त्यांना वल्लभनगर येथील भारतीय महिला नागरी सहकारी पतसंस्थेतून कर्ज मिळवून देतो, असे सांगून त्यांच्याकडून प्रत्येकी १०५० रुपये घेतले. अशा १९ महिलांकडून त्याने पैसे घेतले. मात्र, पुढे काहीही न करता, त्यांना कर्ज मिळवून न देता त्यांची फसवणूक केली.