बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून ३५ लाखांची फसवणूक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – बँकेत बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून बँकेकडून कर्ज घेऊन ३५ लाख ८९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नगर अर्बन बँक यांच्या चाकण शाखेत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी राहुल भगवान बनसोडे, विनायक सुनिल चव्हाण, अनिल प्रेमनाथ मोहिते, अजय सुनिल चव्हाण आणि आनंद विश्वनाथ गवळी (रा. आंबेठाण चौक, चाकण) व इतर ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी बँकेच्या वतीने किसन विठ्ठल काथवटे यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार नगर अर्बन बँकेच्या चाकण शाखेत मार्च २०१७ पासून घडला. आरोपींनी संगनमत करुन खोटे सोन्याचे दागिने असताना ते खरे असल्याचे दर्शवून बँकेकडे खोटे दागिने तारण म्हणून ठेवले व त्याच्या पोटी बँकेकडून ३५ लाख ८९ हजार रुपयांचे कर्ज घेतले. या कर्जाची परतफेड न झाल्याने बँकेने तारण ठेवलेल्या सोन्याचे दागिने मोडून त्यातून कर्जफेड करुन घेण्यासाठी या दागिन्यांची तपासणी केली असता ते दागिने खोटे असल्याचे आढळून आले. त्यानंतर बँकेने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.