जादा परताव्याच्या अमिषाने ३९ लाखांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – गुंतवणूकीवर जादा व्याजदराने परतावा देण्याचे अमिष दाखवून दाम्पत्याने चौघांना ३९ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकऱणी विश्रामबाग पोलिसांनी गंडा घालणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मिलींद जनार्दन पिंपळकर आणि त्यांची पत्नी मोहिनी (रा. सिंहगड रस्ता) अशी दोघांची नावे आहेत. विलास वसंतराव कुरडे (वय ५२,रा. भेलकेनगर, कोथरुड) यांनी यासंदर्भात विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृत्तपत्रात रिअल एज्यूकेशन फर्मची एक जाहिरात दोन वर्षांपुर्वी प्रसिद्ध झाली होती. त्यात गुंतवणूकीवर जादा दराने व्याज देण्याचे अमिष दाखविण्यात आले होते. ती जाहिरात पाहून मोबाईल क्रमांकावर कुरडे यांनी संपर्क साधला. त्यावेळी पिंपळकर दाम्पत्याची ओळख झाली. त्यांनी स्वत: च्या नावाने ५ लाख आणि मुलाच्या नावाने ६ लाख असे एकुण ११ लाख रुपये पिंपळकर दाम्पत्याकडे गुंतविले. त्यानंतर पिंपळकर दाम्पत्याने त्यांना कोणताही परतावा दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे समोर आल्यावर कुरडे यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यावेळी संजय भेलके (रा. धायरी ), भरत विटुरकर तसेच कोंढवा भागातील एका महिलेची पिंपळकर दाम्पत्याने अशाच प्रकारे पैसे घेऊन फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यांना चौघांकडून एकुण ३९ लाख ४ हजार रुपये घेतले व त्याचा कोणताही परतावा त्यांना न देता फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यांनी आणखी काही लोकांना असाच गंड़ा घातला असल्याचा संशय पोलिसांना आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. एम. रायकर तपास करत आहेत.