लष्करासाठीची २ कोटींची औषधांची आर्डर मिळवून देण्यासाठी १९ लाखांची फसवणूक

औषध वितरकांच्या संघटनेतील पदाधिकारी भुलला लष्करी अधिकाऱ्याच्या आश्वासनाला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीतील आर्मड् फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेस येथे फर्मचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तसेच २ कोटी रुपयांची ऑर्डर काढून देण्यासाठी १९ लाख रुपये घेऊन आर्डर न देता औषध वितरकांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी शैलेंद्र गुप्ता (रा. एनआयबीएम रोड, कोंढवा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ३१ जानेवारी २०१९ रोजी घडला आहे. याप्रकरणी महेंद्र पन्नालाल पितळीया (वय ५०, रा. वास्तूनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, शैलेंद्र गुप्ता हे निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. पितळीया यांची वर्धमान मेडिट्रेड एलएल पी चे रजिस्ट्रेशन आर्मड् फोर्स मेडिकल स्टोअर्स दिल्ली तसेच डायरेक्टरेट जनरल आर्मड् फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेस येथे करुन देतो, असे गुप्ता यांनी पितळीया यांना सांगितले. तसेच पितळीया यांच्या फर्म मार्फत विक्री करण्यात येणाऱ्या अक्युव्हेन या उत्पादनाच्या २ कोटी ५५ लाख रुपयांची ३० नगाची आर्डर मिळवून देतो, असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी १९ लाख रुपये घेतले. त्यानंतरही त्यांनी रजिस्ट्रेशन न करता व ऑर्डर मिळवून न देता फसवणूक केली. असे फिर्यादीत म्हटले आहे.