नोटा सरळ करुन देण्याच्या बहाणाने हातचलाखी करुन तरुणाची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरेगाव भीमा येथील भारतीय स्टेट बँक येथे मित्राच्या खात्यामध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या युवकाला नोटा सरळ करून देण्याच्या बहाण्याने एका भामट्याने फसवणूक करत ५० हजार रुपयांतील साडेआठ हजार रुपये हालचलाखी करुन लांबविले. याबाबत शिवाजी लालू बजीरे (रा. लोणीकंद, ता. हवेली, जि. पुणे) याने शिक्रापूर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, शिरुर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील भारतीय स्टेट बँक येथे लोणीकंद येथील शिवाजी बजीरे हा त्याचा पेरणेफाटा येथील मित्र आमिर रमजान शेख यांच्या बँक खात्यावर ५० हजार रुपये भरण्यासाठी बँकेत आला होता. शिवाजी हा बँकेतील पैसा भरणा करणाऱ्या मशीन समोर उभा होता. त्या वेळी शिवाजी याच्या पाठीमागे उभ्या असलेल्या व्यक्तीने शिवाजी यास नोटा सरळ करून भरणा करावा लागतो, असे म्हणून ‘दाखव मी नोटा सरळ करून देतो’ असे म्हणून शिवाजी याच्या हातातील नोटा घेतल्या आणि सरळ करत पुन्हा शिवाजीकडे दिल्या. त्यांनतर लगेचच हा भामटा घाईगडबडीत बँकेतून बाहेर गेला. त्या वेळी शिवाजीच्या आधी पैसे भरून बाहेर गेलेला इसम आतमध्ये आला व शिवाजी याला, ‘तुझे पैसे मोजून देणारा पळत
बाहेर गेलेला असून, तुझे पैसे बरोबर आहे का बघ’ त्या वेळी शिवाजी याने पाहिले असता त्याला त्याच्याजवळील ५० हजार रुपयांपैकी ८ हजार ५०० रुपये कमी असल्याचे आढळून आले. नोटा सरळ करुन देतो, असे सांगून त्याने हातचलाखी करुन शिवाजी यांच्या डोळ्यादेखत त्यातील साडेआठ हजार रुपये नकळत काढून घेतल्याचे आढळून आले. शिक्रापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.