मोक्षप्राप्तीच्या नावाखाली लुटणाऱ्या महिलांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – संपूर्ण जीवन मुक्तीसाठी कलकी आर्मीमध्ये ६४ हजार लोकांची निवड करण्यात येणार आहे, त्याच्या प्रत्येकी कार्डची ५०० रुपये किंमत असल्याचे सांगून अनेक महिलांना लुबाडणाऱ्या चौघा महिलांवर भोसरी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
निवेदना ऊर्फ वाय माधवी (वय ४४, रा. गगन अव्हेन्यू, कोंढवा कात्रज रोड, खडी मशीन, कोंढवा), अस्मिता अनिल राव (वय ३४, रा. गणेशनगर, डांगे चौक, वाकड), पी. राधादेवी ऊर्फ विशिष्ठा (वय ४२, रा वाकड) आणि अर्चना हारगुडे (वय ३८, रा. वाघोली) अशी त्यांची नावे आहेत.

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात राज्यातील २ जवान शहीद 

याप्रकरणी मोशी येथे राहणाऱ्या एका ५५ वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली आहे. या महिला अम्मा भगवान यांच्या २००५ पासून भक्त आहेत. आरोपी महिला या फिर्यादी यांना अम्मा भगवान यांचे वैयक्तिक दर्शनासाठी तसेच तेथील आश्रमात हवन करण्यासाठी, नवग्रह हवन करण्यासाठी, अन्नदानासाठी २००५ पासून २०१८ पर्यंत रोख स्वरुपात पैसे घेतले. प्रत्येक वेळी होमहवन व इतर विधी केला आहे. त्यानंतर आक्टोंबर २०१८ मध्ये या महिला फिर्यादीच्या मोशी येथील घरी आल्या. व त्यांना सांगितले की, संपूर्ण जीवन मुक्तीसाठी कलकी आर्मीमध्ये ६४ हजार लोकांची निवड करण्यात येणार आहे. या ६४ हजार लोकांची निवड करण्यासाठी लाखो कार्डांचे वाटप करण्यात आले आहे. या प्रत्येक कार्डाची किंमत ५०० रुपये आहे, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी ५०० रुपये घेऊन कार्ड दिले. त्यावर त्यांचे मराठीत नाव व मोबाईल नंबर लिहिलेला होता. तसेच त्यावर आय एम इन ६४००० मुक्ती साधक, द कलकी आर्मी आफ रिव्होलुशन इन लव्ह़ असे लिहिलेले होते. त्यावर कोणत्याही ट्रस्टचे नाव नाही. त्याचेवर रक्कम लिहिलेली नाही. तारीख लिहिलेली नाही.

आपल्याप्रमाणे आश्रमात येणाऱ्या अनेक महिलांना त्यांनी अशी कार्डे दिल्याची माहिती त्यांना मिळाली. हे पाहून आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. आतापर्यंत ८ महिलांनी तक्रार दिली असून अशा प्रकारे या महिलांनी असंख्य महिलांची फसवणूक केली असल्याचा अंदाज आहे.