सोन्याच्या बिस्किटासाठी तिने दिले गळ्यातील मंगळसुत्र काढून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अनोळखी व्यक्तीकडून काही घेऊ नका, असे सांगितले जात असतानाही त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. दागिने म्हटले की त्याचा मोह भल्या भल्यांना सोडवत नाही. सोन्याच्या बिस्कीटासाठी एका महिलेने आपल्या गळ्यातील मंगळसुत्रासह सर्व दागिने काढून चोरट्यांच्या हवाली केले. हा प्रकार गुरुवारी निगडी प्राधिकरणात घडला.

याप्रकरणी गंगुबाई चंनबसय्या स्वामी (वय ४५, रा. दत्तवाडी, आकुर्डी) यांनी निगडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्या गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता निगडी प्राधिकरणातील सावली हॉटेलसमोर आल्या होत्या. यावेळी त्यांच्या मागाहून तिघे जण आले. त्यांनी त्यांना लाल रंगाच्या कापडामध्ये गुंडाळलेले सोन्याचे बिस्कीट असल्याचे सांगून त्यांची बाजारात दीड लाख रुपये आहे. त्याच्या बदल्यात तुमच्या अंगावरचे दागिने द्या असे सांगितले.

इतक्या कमी किंमतीत सोन्याचे बिस्कीट मिळत असल्याचे पाहून त्यांनी आपल्या अंगावरील ५ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसुत्र, कानातील कर्णफुले व २ हजार रुपये असा ३२ हजार रुपयांचा ऐवज त्या तिघांच्या हवाली केला. त्याबरोबर ते तिघे निघून गेले. त्यानंतर काही अंतरावर गेल्यावर त्यांनी लाल कापड उघडून पाहिल्यावर त्या सोन्याचे बिस्कीट नसून ते नकली असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि मग पश्चाताप करण्याची पाळी त्यांच्यावर आली.