Jiomart च्या फ्रेंचायजी संदर्भात तुम्हाला मॅसेज आलाय ? जाणून घ्या ‘सत्य’ अन्यथा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जिओमार्टचा फ्रँचायझी मिळण्याच्या बहाण्याने फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर आल्यानंतर कंपनी कारवाई करताना दिसत आहे. गुरुवारी कंपनीने लोकांना या घोटाळ्यात अडकू नयेत म्हणून चेतावणी नोटीस बजावली. नोटीसमध्ये कंपनीने लोकांना अशा प्रकारच्या लोकांपासून सावध राहण्यास सांगितले आहे, जे जिओमार्टच्या नावावर बनावट वेबसाइट्स बनवून लोकांना फ्रँचायझी किंवा डीलरशिप मिळवून देण्याचे खोटे वचन देतात.

रिलायन्सच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा इशारा प्रसिद्ध झाला आहे. नोटीसमध्ये रिलायन्स रिटेलने म्हटले आहे की, “आम्ही सध्या कोणतेही डिलरशिप किंवा फ्रेंचायझी मॉडेल चालवित नाही किंवा आम्ही एखादा डीलर नियुक्त करण्यासाठी फ्रेंचायजी किंवा कोणताही एजंटला नियुक्त केलेले नाही.” तसेच आम्ही फ्रँचायझी नेमण्याच्या नावाखाली कोणतीही रक्कम घेत नाही. 30 कोटी लघु किराणा दुकानदार आणि 12 कोटी शेतकर्‍यांना त्याच्या नेटवर्कद्वारे जोडण्याची जिओमार्टची इच्छा आहे. जिओमार्टवर दररोज 4 लाखाहून अधिक ऑर्डर बुक होत आहेत. कंपनीच्या त्याच विश्वासार्हतेचा फायदा फसवणूक करणारे घेत आहेत.

नोटीसमध्ये म्हटले आहे की, काही घोटाळेबाज जिओमार्टशी संबंधित असल्याचे भासवून बनावट वेबसाइट्स तयार करीत आहेत आणि जिओमार्ट सर्व्हिसेसच्या फ्रेंचायजी देण्याच्या बहाण्याने निरपराध व्यक्तींची फसवणूक करत आहे.. कंपनीने काही बनावट वेबसाइटची यादीही जाहीर केली आहे. ट्रेडमार्कचा गैरवापर रोखण्यासाठी आणि त्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी फसव्या व्यक्ती आणि टोळ्यांविरूद्ध फौजदारी किंवा दिवाणी कारवाई करण्याचा इशारा रिलायन्स रिटेलने दिला आहे. कंपनीने अशा फसवणूकी करणार्‍यांविरूद्ध कंपनीच्या कायदेशीर कक्षाकडे तक्रार करण्याचे आवाहन कंपनीने केले आहे.