प्रधानमंत्री मुद्रा लोनच्या नावाने फसवणुक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देतो असे सांगून देशभरात फसवणुक करण्याचे प्रकार होत असतात. आता त्यात प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचा समावेश झाला आहे. मार्केटयार्डमधील एका व्यावसायिकाला ५० लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगून ७ लाख ८१ हजार ९१३ रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी सुभाष शंकरलाल जैन (वय ६५, रा. गंगाधाम सोसायटी, मार्केयार्ड) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ५ ते २९ ऑक्टोंबर २०१९ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैन यांनी प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत कर्जासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. एकाने त्यांना फोन करुन ऑनलाईन अर्जाची जैन यांच्याकडे चौकशी केली. त्यानंतर त्यांनी जैन यांना ई-मेल करुन ५० लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या मोबाईलवरुन फोन करुन त्यांचा विश्वास संपादन केला.

मंजूर झालेले कर्ज मिळण्यासाठी आवश्यक अटी पूर्ण करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात ७ लाख ८१ हजार ९१३ रुपये पाठविण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी पैसे पाठविल्यानंतरही त्यांना कर्ज मिळाले नाही. त्यानंतर त्यांना आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी मार्केटयार्ड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like