सुनेनेच सासऱ्याला घातला २५ लाखांना गंडा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – खासगी कंपनीतील निवृत्त अधिकाऱ्याला शेअर मार्केटमध्ये अल्पावधीत जास्त लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या सुनेने आपल्याच सासऱ्याला तब्बल २५ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी नंदिनी विजयकुमार ब्रम्हे (वय ३२) हिला पुण्यातून अटक केली आहे.

याबाबत दिगंबर गणपतराव क्षीरसागर (वय ७०, रा. गायत्रीनगर, नागपूर) यांनी फिर्याद दिली आहे. ते एका खासगी कंपनीत अधिकारी होते. ते शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असत. त्यातून पोर्ट फिलिओ कंपनीतील एजंट नंदिनी यांच्याशी त्यांचा परिचय झाला. आपल्या कंपनीच्या माध्यमातून शेअर मार्केमध्ये रक्कम गुंतविल्यास १० ते १५ टक्के लाभ मिळवून देईल, असे अमिष नंदिनीने त्यांना दाखविले. तिचे लाघवी बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांनी सप्टेंबर २०१७ मध्ये तिच्याकडे काही रक्कम गुंतविण्यास दिली. त्यासाठी तिचे त्यांचे घरी येणे जाणे वाढले. त्यातून त्यांचा मुलगा विजयकुमार यांच्याशी तिने प्रेमविवाह केला. सून म्हणून घरात आल्यावर तिने २०१७ ते २९ जानेवारी २०१९ पर्यंत क्षीरसागर यांच्याकडून वेगवेगळी रक्कम उकळून ती शेअर बाजारात गुंतविली असल्याचे भासविले. तिच्या वर्तनाचा संशय आल्यावर त्यांनी नंदिनीकडे आपली रक्कम परत मागितल्यावर तिने प्रत्येक वेळी जुनी रक्कम काढण्यासाठी पुन्हा नवीन रक्कम भरण्यास सांगत होती. रक्कम भरली नाही तर जुनी रक्कम बुडेल, अशी भिती दाखवत होती. त्या सर्व प्रकारात क्षीरसागर यांनी दागिने विकले. प्लॉट आणि राहते घर गहाण ठेवले. त्यांच्याकडून गेल्या दीड वर्षात नंदिनीने २५ लाख रुपये हडपले. शेवटी क्षीरसागर यांनी संबंधित कंपनीतील अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यावर नंदिनीने ही रक्कम कंपनीत गुंतविलीच नसल्याचे स्पष्ट झाले.

आपले पितळ उघडल्याचे समजल्यावर नंदिनी पुण्याला पळून गेली. शेवटी क्षीरसागर यांनी प्रतापनगर पोलिसांकडे फिर्याद दिली. तिचे मोबाईल लोकेशनवरुन ती पुण्यात असल्याचे समजल्यावर पोलिसांनी तिला नागपूरला आणून अटक केली आहे.