नामांकित डॉक्टरचं बँक अकाऊंट झालं रिकामं, बारामती शहरातील धक्कादायक प्रकार

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – तुम्ही वापरत असलेल्या पेटीएमचे केवायसी अपूर्ण असल्याचे सांगत बारामतीतील एका नामांकित डॉक्टरकडून ओटीपी क्रमांक घेत त्यांची तब्बल 3 लाख 32 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात राकेश मल्होत्रा या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी डॉ. महेंद्र रमणलाल दोशी (वय-67) यांनी फिर्याद दिली आहे.

डॉ. दोशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दोशी यांचे शहरात रमण हॉस्पिटल आहे. त्यांची अ‍ॅक्सिस बँक व आयसीआयसीआय बँकेत खाती आहेत. अ‍ॅक्सिस बँकेत पती-पत्नीच्या नावे सलग्न खात आहे. आयसीआयसीआय बँकेच्या खात्याद्वारे ते पेटीएम अ‍ॅप वापरतात. दि. 29 जुलै रोजी त्यांच्या बँकेकडे नोंदणीकृत असलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन आला. मोबाईलधारकाने त्याचे नाव राकेश मल्होत्रा असे सांगत पेटीएम अ‍ॅप कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. तुमचे पेटीएमची केवायसी पेपर अपूर्ण आहेत. त्यामुळे पुढील 24 तासात ते बंद होईल. हे अ‍ॅप चालू ठेवण्यासाठी केवायसी पूर्ण करण्यासाठी मी सांगतो त्या प्रमाणे करा, असे सांगितले.

मोबाइलधारकाने ऑनलाइन क्विक सपोर्ट अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर दोषी यांच्या अ‍ॅक्सिस बँकेत असणाऱ्या अकाऊंटचा मिळालेला ओटीपी नंबर घेऊन अ‍ॅक्सिस बँक अकाऊंटमधील सर्व रक्कम काढून घेतली. तसेच त्यांचे आयसीआयसीआय बँक खात्यातून देखील सर्व रक्कम काढून घेतली. एवढ्यावरच न थांबता त्या भामट्याने डॉक्टरांच्या पत्नी संगीता यांच्या खात्यामधून देखील रक्कम काढून घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर हे करत आहेत.

दुसरीकडे, पिंपरी चिंचवडमध्ये एका डॉक्टरची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. डॉक्टरांसाठी असलेल्या योजनेतून आठ कोटीचे कर्ज काढून देतो, असे सांगून एका भामट्याने डॉ. अमित वाघ यांची 40 लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत वाघ यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.