भाजप खासदार चेअरमन असलेल्या बँकेत खोट्या सोन्यावर घेतले 35 लाखांचे कर्ज

चाकण पोलीस ठाण्यात 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर/पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – भाजपाचे खासदार दिलीप गांधी चेअरमन असलेल्या नगर अर्बन बँकेच्या चाकण शाखेत बनावट सोने तारण ठेऊन 35 लाख 89 हजार रूपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शनिवारी रात्री चाकण पोलीस ठाण्यात 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये राहुल बनसोडे, विनायक चव्हाण, अनिल मोहिते, अजय चव्हाण, आनंद गवळी, नितीन थिगडे, विनोद जाधव, सुशीलकुमार कांबळे, परमानंद भागवत, सुनिल सावंत, भीमराव दोंद, सलोनी वैद्य, कांता सोनवणे, विवेक माळवे यांचा समावेश आहे.

नगर अर्बन को – ऑपरेटीव्ह बँकेच्या चाकण शाखेचे किसन काथवटे यांनी चाकण पोलिसांत फिर्याद दिली आहे. वरील सर्वांनी वेगवेगळ्या वेळी बँकेत खोटे सोन्याचे दागिने असताना ते खरे भासवून सोने तारण ठेऊन 35 लाख 89 हजार रुपयांचे कर्ज घेतले. नगर अर्बन को- ऑपरेटीव्ह बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधीतांच्या फाईल ची तपासणी केली असून यामध्ये सोने तारण ठेऊन अनेकांनी कर्ज घेतल्याचे निदर्शनास आले. संबंधीत तारण ठेवलेल्या सोन्यावर बँकेच्या अधिकाऱ्यांना संशय आला त्यानंतर सोने तपासणाऱ्या अन्य तज्ञांना बोलाऊन तारण ठेवलेल्या सोन्याची तपासणी केली तेंव्हा हे सोने बनावट असल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान, या घटनेबाबत चाकण पोलिसांना काही दिवसांपूर्वी माहिती देण्यात आली होती. शनिवारी बँकेकडून प्राप्त झालेल्या तक्रारीवरून चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकाराशी संबंधीत अनेकांकडे तक्रार चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.