वृद्ध महिलेच्या असहायतेचा गैरफायदा घेत २८ लाख ८४ हजार हडपले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – वृद्ध महिलेची सेवा करण्याच्या बहाण्याने तिच्या असहायतेचा गैरफायदा घेत खात्यातील २८ लाख ८४ हजार रुपये हडपल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरुण व्हिक्टरी थॉमस (६२, नेहरू मेमोरियल हॉलसमोर, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुरेश हरिहरन (५०, वाकडेवाडी) याच्याविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी थॉमस व हरिहरन एकमेकांच्या ओळखीचे आहेत. तर फिर्यादी यांची आत्या जॉय चांदी या वयोवृद्ध आहेत. त्यांना ऱ्हदय व गुडघ्यांचा त्रास असल्याने फिर्यादी थ़ॉमस यांनी त्यांची काळजी घेण्यासाठी तसेच सेवा करण्यासाठी कोणी आहे का असे हरिहरन याच्याकडे विचारले. त्यानंतर त्याने मी स्वत: ज्येष्ठ नागरिकांची सेवा करतो असे म्हणला. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून हरिहरन याची नेमणूक त्यांची सेवा करण्यासाठी केली. परंतु त्याने वयोवृद्ध जॉय चांदी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या बँक ऑफ इंडीयाच्या कॅम्प शाखेतील खात्यावरून २८ लाख ८४ हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केली. पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.