रायगड व पुरंदर तालुक्यात जमीन खरेदीत गुंतवणुकीच्या आमिषाने 75 लाख रुपयांची फसवणूक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – रायगड व पुरंदर तालुक्यात जमीन खरेदीत गुंतवणुकीच्या आमिषाने 75 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात एक्सपॅट प्रोजेक्ट अँड डेव्हलपमेंट कंपनीचे संचालक सच्चिदानंद रामप्पा कांचन, संतोष बाळकृष्ण शेट्टी, नेनमूल भाटिया, लॅसेल व्हिक्टर डिसोजा, संतोष अलेक्झांडर बेंजमिन, वर्लिन डिसोजा, अर्पिल वाघमारे यांच्यासह बाराजणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नितेश कांतीलाल ठक्कर (रा. वाकड) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्सपॅट प्रोजेक्ट कंपनीचे कार्यालय पौड परिसरात आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय बंगळुरूमध्ये आहे. या कंपनीकडून ठक्कर यांना जमीन खरेदीत गुंतवणुकीचे आमिष दाखविण्यात आले होते.

रायगड जिल्ह्यात कुडळी विले गावात गर्व व्हिलेज, रोहा परिसातील पार्क व्ह्यून्यू आणि पुरंदरमधील पांगारे गावात असलेल्या लावण्या प्रकल्पात बंगल्यासाठी जमीनीची विक्री करण्यात येणार आहे. या प्रकल्पात गुंतवणूक केल्यास व्याज दिले जाईल किंवा त्यापोटी जमीन दिली जाईल, असे आमिष दाखविले. तसेच त्यांचा विश्वास संपादन केला. ठक्कर, त्यांची पत्नी व नातेवाईकांनी या प्रकल्पात ७५ लाख ४३ हजार ६२५ रुपये गुंतवले होते. त्यानंतर कंपनीकडून व्याज देण्यात आले नाही तसेच जमीन देण्यास नकार देण्यात आला. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक प्रतिभा जोशी करत आहेत.