कोंढवा : बांधकामामध्ये गुंतवणूक करण्याच्या आमिषाने 74 लाखांची फसवणूक, FIR दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बांधकामामध्ये गुंतवणूक केल्यास इमारतीमधील 10 फ्लॅट किंवा चांगला मोबदला देण्याचे आमिष दाखवून 74 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रफीक मोहंमद शेख (रा. कोंढवा) याच्याविरोधात कोंढवा पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 2011 पासून सुरू होता.

या प्रकरणी सचिन सोमनाथ जांभुळकर (वय 42, रा. जांभुळकरमळा, भैरोबानाला) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन जांभुळकर यांना रफीक शेख यांनी कोंढवा येथील ताहीर हाईट्स या इमारतीच्या बांधकामात गुंतवणूक करण्यास सांगितले. त्या बदल्यात सचिन यांना 10 फ्लॅट्स किंवा योग्य मोबदला देण्याचे कबूल केले. रफीक याने सचिन यांना सहा महिन्यांत रोख स्वरूपात मोबदला देण्याचे मान्य केले होते.

परंतु रफीक शेख यांनी इमारतीचे बांधकाम पूर्ण न करता सचिन यांना फ्लॅट्स दिले नाहीत. तसेच गुंतवणूक केलेली रक्कम जांभुळकर यांना परत न करता त्यांची फसवणूक केली. याबाबत सचिन यांनी रफीक शेख यांच्याकडे चौकशी केली असता, शेख याने जांभुळकर यांनाच धमकी दिली. तुझे पैसे देत नाही, जा काय करायचे ते कर, मला त्रास दिला तर तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर करीत आहेत.