शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत झालं 10 हजारांहून अधिक बोगस मतदान; संस्थापकांचा आरोप

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – नुकतीच शिक्षक मतदारसंघाची निवडणूक १ डिसेंबर २०२० रोजी पार पडलेली आहे. या पार्श्वभूमीवर, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये दहा हजारांवर बोगस मतदान झाल्याचा गंभीर आरोप शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी केला आहे. या झालेल्या प्रकाराबद्दल आपली बाजू मांडण्यासाठी ते महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची भेट घेणार आहेत.

भारतीय राज्यघटना तसेच भारत निर्वाचन आयोग यांनी मतदारांची पात्रता नमूद केली आहे. भारत निर्वाचन आयोगाच्या लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या भाग २७(५) (ब) नुसार त्या मतदाराने अथवा शिक्षकाने ३ वर्षे सातत्यपूर्ण सेवा दिलेली असणे आवश्‍यक आहे. हा मतदार माध्यमिक शाळेच्या पेक्षा कमी दर्जाचा नसावा अनुदानित शाळा, विना अनुदानित शाळेवरील शिक्षक व त्यापेक्षा उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालये, वरिष्ठ महाविद्यालये, आय.टी.आय. व तत्सम महाविद्यालयीन दर्जाचा असावा असे नमूद केले आहे. परंतु अमरावती विभाग विधानपरिषद शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादीमध्ये प्राथमिक शिक्षक, कॉन्व्हेंट वरील शिक्षक, लिपिक, प्रयोगशाळा परिचर, शिपाई, ऑटो चालक, हॉस्पिटलचे कर्मचारी यांची सुद्धा नोंदणी झाली होती. तसेच ज्या शाळा अस्तित्वताच नाही त्या शाळा व तेथील मतदार सुद्धा मतदार यादीमध्ये नमूद होते.

दरम्यान, अमरावती विभागातील अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेखर भोयर यांनी केला. परिणामी जे मतदार नाहीत अशा तब्बल दहा हजारांहून अधिक बोगस मतदारांनी मतदान केले, असा आरोप शेखर भोयर यांनी केला. परंतु, राज्याचे प्रमुख म्हणून या सर्व बाबी स्पष्ट करण्याकरिता व आपली बाजू मांडून बोगस मतदारांवर कार्यवाही व्हावी याकरिता शेखर भोयर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांना शिष्टमंडळासह भेटीसाठी वेळ मागितला आहे. १२ ऑक्‍टोबर २०२० रोजी निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील दाखल करण्यात आली. त्यांनी त्यात दुरुस्तीचे आदेश दिले होते.