सावधान ! ‘ओएलएक्स’ वरून हार्ली डेव्हिडसन विकताय

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – हार्ली डेव्हिडसन ही दुचाकी विकण्यासाठी ओएलएक्सवर जाहीरात देऊन आगाऊ रक्कम ऑनलाईन पाठवण्याचा बहाणा करून एकाने त्याची सर्व माहिती विचारून चक्क १ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ५ मे रोजी कोथरूड येथे घडला.

याप्रकरणी कोथरूड येथील ४६ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांच्याकडे हार्ली डेव्हिडसन ही महागडी दुचाकी होती. ही दुचाकी त्यांना विकायची असल्याने त्याचे फोटाे त्यांनी ओएलएक्सवर टाकले. एका अनोळखी व्यक्तीने त्यांची दुचाकी विकत घेण्यामध्ये रस असल्याचे दाखवून त्यांने आगाऊ रक्कमेपोटी ५० हजार रुपये गुगल-पे या ई वालेटवर पाठवतो असे सांगितले. त्यानंतर त्याने फिर्यादी यांना एक लिंक पाठवून दिली. संबंधीत लिंकवर आवश्यक माहिती भरण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी लिंकमधील माहिती भरण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्यांच्या बँक खात्यातून एक लाख रुपये काढून घेण्यात आले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेतली. कोणी पैसे पाठवितो म्हणून एखादी लिंक पाठविली तर त्यात आपल्या खात्याची गोपनीय माहिती भरु नये, पासवर्ड कोणाला सांगू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) आर.आर. तटकरे करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त