Jalana News : गंडा घालणार्‍याचं बेरोजगारांकडून अपहरण, पोलिसांमुळं अनर्थ टळला

जालना : पोलीसनामा ऑनलाइन –   बेरोजगार तरुणांना आमिष दाखवून लाखो रुपयांना लुटणाऱ्याचे जालन्यातून अपहरण करुन त्याला सातारा येथे नेण्यात आले होते. याप्रकरणी सदर बाजार पोलिसांनी नऊ जणांना शुक्रवारी (१५ जानेवारी) अटक केली आहे.

विठ्ठल विजयसिंग जारवाल (रा. राजेवाडी ता. बदनापूर) असे अपहरण झालेल्या व्यक्तीचे नाव असून, सतीश गराडे (वय २३ रा. आमनेवाडी जि. कोल्हापूर), प्रशांत संभाजी पवार (वय २९ रा. करंजोशी जि. कोल्हापूर), वैभव भैरू पाटील (वय २१. रा. तिरपण्या जि. कोल्हापूर), पुष्पराज मारोती जाधव (२६ रा. युलुर जि. सांगली), वैभव भास्कर शेशवारे (३५. रा. अगरण धुळगाव, जि. सांगली), मनोहर भास्कर शेशवारे (४२ रा. अगरण धुळगाव जि. सांगली), नितीन बाळू दाढे (२३, रा. वाफळे जि. सोलापूर), गणेश पांडुरंग दाढे (२९, रा. वाफळे जि. सोलापूर), शरद बाळू दाढे (२५ रा. वाफळे, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून टाटा सुमो गाडी पोलिसांनी जप्त केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जालना बसस्थानकावर विठ्ठल जारवाल आपल्या मित्रांसोबत सकाळच्या सुमारास उभा होता. तेव्हा नऊ जणांनी त्याला मारहाण करत गाडी बसवून घेऊन गेले. याप्रकरणी जारवालच्या कुटूंबीयांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी बसस्थानकातील सीसीटिव्हीवरून गाडीचा नंबर प्राप्त केला. त्यावरुन अपहरणकर्ते अंबड, पैठण, शेगाव मार्गे जात असल्याने सातारा, कोल्हापूरकडे पथके रवाना झाली. तसेच नगर, सातारा, कोल्हापूर नियंत्रण कक्षास माहिती देण्यात आली.

सातारा पोलिसांनी संबंधित युवकांचे फोन नंबर ट्रेस करुन अपहरण झालेल्या तरुणाची सुटका केली. त्यावेळी नऊ आरोपींना अटक करण्यात आली.

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्र्यासोबत आपली ओळख असल्याचे भासवून सातारा येथील तरुणांना विठ्ठल जारवालने नोकरीचे आमिष दाखवले होते. या बेरोजगार तरुणांनीही आमिषाला बळी पडत त्याला रोख रक्कम दिली. बरेच दिवस झाले तरी नोकरीबाबत काहीच हाती
लागत नसल्याच्या कारणाने तरुणांनी विठ्ठलकडे पैशाची मागणी केली. मात्र, विठ्ठलने चालढकल केल्याने संतापाच्या भरात तरुणांनी जालन्यात येऊन त्याचे अपहरण केले.