ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! राज्यात 100 युनिट वीज ‘मोफत’, नवं वीज धोरण 3 महिन्यात

मुंबई, पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार सर्वसामान्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. दिल्लीत ज्याप्रमाणे वीज धोरण राबवले जात आहे त्या धर्तीवर राज्यात देखील सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा सरकारचा विचार आहे. राज्यात सरकारने नवे वीज धोरण आणण्याची तयारी केली आहे. राज्यात 100 युनिटपर्यंतची वीज मोफत देण्याची तयारी सरकार करत आहे, यासंबंधित धोरण लवकर येणार असल्याची घोषणा ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी विधानपरिषेदत दिले.

घरगुती वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज देण्यासाठी एक समिती अभ्यास करत आहे. या समितीचा अहवाल तीन महिन्यांत प्राप्त झाल्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल असेही नितीन राऊत मंगळवारी म्हणाले. राज्यातील वीजदर कमी व्हावा, यासंदर्भात अभ्यास करुन हे नवे वीज धोरण राज्यात आणले जाईल तसेच त्यात 100 युनिटपर्यंत मोफत वीज देणे आणि शेतकऱ्यांना दिवसा शेतीसाठी चार तास वीज देण्याचा प्रस्ताव असल्याचे देखील मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले. यावेळी ते एका लक्षवेधीला उत्तर देत होते.

देशातील सर्वात महाग वीज महाराष्ट्रात असल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश गजभिये यांना मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. याला उत्तर देताना पुढे ऊर्जा मंत्री नितीन राऊत म्हणाले, राज्यात मोठे उद्योग आणण्यासाठी एमआयडीसी खासगी कंपन्यांकडून वीज घेण्याचा विचार करत आहे. अशा परिस्थितीत एमएसईबी काय करणार असा सवाल काँग्रेसचे शरद रणपिसे यांनी विचारला. यावर बोलताना सरकार नवीन तंत्रज्ञान वापरुन संचलन आणि सुव्यवस्थेतील खर्च मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ऊर्जा मंत्री म्हणाले.

महावितरण मीटरींग आणि बिलिंगसह विविध क्षेत्रात योग्य उपाययोजना करुन वितरण हानी कमी करण्याचा प्रयत्न करण्यावर भर असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.