पुण्यात नवी स्कीम; ‘लसीकरण करा अन् मोफत घेऊन जा चितळेंची भाकरवडी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. तर दुसरीकडे देशात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार, आतापर्यंत हजारो नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. पण काहींनी अद्याप ही लस घेतली नाही. त्यामुळेच आता या सर्वांना प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यातील प्रसिद्ध चितळे भाकरवडी अगदी मोफत दिली जाणार आहे. याबाबतची माहिती ट्विटरवरून देण्यात आली.

चितळे ग्रुप आणि मसिआ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जात आहे. ‘पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स’ या मसिआच्या उपक्रमांतर्गत ही योजना राबवली जात आहे. त्यानुसार, पुण्यातील विविध केंद्रांवर होत असलेल्या कोरोनाच्या लसीकरणानंतर लस घेणाऱ्या प्रत्येकाला चितळेंची भाकरवडी मोफत दिली जात आहे. लस घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीला चितळेंच्या भाकरवडीचे प्रत्येकी 50 ग्रॅमचे पॅकेट मोफत देण्यात आले.

नायडू हॉस्पिटल, हडपसरचे अण्णासाहेब मगर हॉस्पिटल, येरवड्याचे राजीव गांधी हॉस्पिटल, धानोरीतील स्व. ग्यानबा तुकाराम हॉस्पिटल, वडगाव शेरी येथील मीनाताई ठाकरे हॉस्पिटल याठिकाणी लस घेणाऱ्यांना हे पाकिट वाटप केले जात आहे. एका दिवसात अशी पाच हजार पाकिटे मोफत वाटण्यात आली.