दक्षिण कोरियात खळबळ ! सैन्याला दिला ‘हा’ आदेश

सेऊल : पोलीसनामा ऑनलाइन – उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांच्यावर कार्डियोवेस्क्युलेरची शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर ते कोमात गेले असल्याचा दावा ब्रिटनच्या एका वृत्तपत्राने केला होता. तसेच किम जोंग उन यांचा मृत्यू झाला असल्याचा दावा देखील आंतराष्ट्रीय माध्यमांनी केला होता. पण किम जोंग २० दिवसांनंतर एका फॅक्टरीच्या उदघाटन कार्यक्रमप्रसंगी सार्वजनिक कार्यक्रमात दिसले होते. मात्र, सध्या देशाचा कारभार त्याची बहीण आणि उत्तराधिकारी समजली जाणारी किम यो जोंग ही पाहत आहे. तिने दक्षिण कोरियाला सैन्य कारवाईची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.

यो जोंगने दक्षिण कोरियाला हल्ल्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. त्यानंतर दक्षिण कोरियाने तातडीने लष्करी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. यो जोंगने द. कोरियास शत्रू राष्ट्र म्हटले आहे. तसेच पुन्हा धमकी देत हल्ला करण्याचे वक्तव्य केले आहे. दक्षिण कोरिया लवकरच सीमेवरती बिनकामाच्या संपर्क कार्यालयाच्या बंद होण्याचा साक्षीदार बनणार आहे. आता मी दक्षिण कोरियाविरोधात कारवाईचे अधिकार सैन्य दलावरती सोपावत असल्याचं जोंग यांनी सांगितलं.

किम यो जोंग ने म्हटलं की, सर्वोच्च नेता, आपला पक्ष आणि देशाकडून देण्यात आलेल्या अधिकार आणि ताकदीचा वापर करुन शस्त्रागाराच्या विभाग प्रमुखास मी असे आदेश देत आहे की, दक्षिण कोरियावरती जोरदार कारवाई करण्यात यावी. महत्वाचे म्हणजे यो जोंग ही किम जोंग उंची सर्वात विश्वासू आणि दक्षिण कोरियासोबत संबंध ठेवण्याच्या निर्णय प्रक्रियेची प्रमुख आहे. त्यामुळे तिचे या हल्ले करण्याच्या आदेशामुळे दक्षिण कोरियात खळबळ उडाली आहे.

नेमके काय आहे प्रकरण ?

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती दोन्ही देशांदरम्यानचे संपर्क कार्यालये जानेवारी पासून बंद आहे. २०१८ साली जोंग उन आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जेऊ यांच्यामधील तीन बैठकांनंतर संपर्क कार्यालये बनविण्यात आली होती. दक्षिण कोरियाने सीमेवर बदनामीकारक व विरोधात पत्रके वाटल्यामुळे उत्तर कोरियाने मागील आठवड्यात मोठा निर्णय घेत, या शत्रू देशाशी सैन्य आणि राजनैतिक संबंध तोडून टाकले आहेत. कोरियाच्या केंद्रीय वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर कोरियाच्या सीमेवरती त्यांच्या विरोधात पत्रके वाटण्यापासून दक्षिण कोरियाने या लोकांना रोखले नाही. त्यामुळे किम जोंग उनने याची कडक शब्दांत निंदा केली असून दक्षिण कोरियाच्या विरोधात कठोर कारवाई करत, मंगळवार पासून दोन्ही देशांदरम्यान संपर्क कार्यालयातील संचार लाईन आणि राष्ट्रपती कार्यालयातील हॉट लाईन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर कोरियाचे नागरिक दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांच्या या विश्वासघातकी वागण्यामुळे खूप नाराज असल्याचं दिसतं आहे.