नीरेत पुरंदरमधील पत्रकारांची झाली मोफत आरोग्य तपासणी

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन – पत्रकारांची मातृसंस्था समजली जाणाऱ्या मराठी पत्रकार परिषद, मुंबईच्या ८२ व्या वर्धापनदिनानिमित्त पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पुरंदरमधील पत्रकारांची नीरा (ता. पुरंदर) येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, सामाजिक कार्यकर्ते भैयासाहेब खाटपे
यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने आरोग्य शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ननवरे होते.

या वेळी शिबिरास नीरा प्राथमिक आरोग्य केंद्र, नीरा मेडिकल असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, नीरा-लोणंद यांनी सहकार्य केले. यामध्ये रक्तातील साखर, कोलेस्ट्राॅल, हिमोग्लोबिन, उच्च रक्तदाब (बी.पी.), सोनोग्राफी, डोळे, नाक, कान, घसा अशा विविध तपासण्या पत्रकार संघाच्या सदस्यांच्या करण्यात आल्या.

नीरा येथील डॉ. निरंजन शहा, डॉ. लीलाधर मंदकनल्ली, डॉ. राम रणनवरे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील लोणकर, पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बी. एम. काळे, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ननवरे यांनी पत्रकारांना मार्गदर्शन केले.

यावेळी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष दत्तानाना भोंगळे, अमोल बनकर, राजेंद्र शिंदे, राजेंद्र बर्गे, प्रकाश फाळके, श्रद्धा जोशी, ज्युबिलंट कंपनीचे इसाक मुजावर, अजय ढगे, उत्तमराव आगवणे, फिरोज सय्यद , आरोग्य सहायक गणेश जाधव, आरोग्य सेवक शिवाजी चव्हाण यांच्यासह पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते.

प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारे ताणतणावाला सामोरे जावे लागते. अशा वेळी तणावरहीत राहण्यासाठी आपण कोणत्या गोष्टीत आनंदीत राहू शकतो, त्यासाठी आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून त्यामध्ये सहभागी झाले पाहिजे . तसेच चांगले आरोग्य राहण्यासाठी वेळेवर जेवण, झोप, व्यायाम याकडे प्रत्येकाने लक्ष दिले पाहिजे, तरच आपण तणावमुक्त राहू शकतो, असा सल्ला नीरा येथील प्रसिद्ध डॉ. निरंजन शहा यांनी पत्रकारांना दिला. कोरोना रुग्णांना उपचारावेळी कुटुंबातील व्यक्तींंना व नातेवाईकांना भेटू देत नसल्याने त्या रुग्णांना मानसिक तणावाला सामोरे जाऊ लागले. त्यामुळे पत्रकारांनीदेखील समाजात काम करताना काळजी घेतली पाहिजे, असे मत डॉ. लीलाधर मंदकनल्ली यांनी व्यक्त केले.
प्रास्ताविक पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राहुल शिंदे यांनी केले. पत्रकार भारत निगडे यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार पत्रकार मोहंमदगौस आतार यांनी मानले.